श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारातील एका नऊ वर्षीय बालिकेवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी संतोष रामभाऊ उर्फ रामराव पवार, युवराज नंदू शेंडगे (दोघेही रा. पार्वतवाडी, लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा) या दोघांना जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांनी जन्मठेपेची शिक्षा व तीस हजार दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणाची अधिक माहिती अशी, 7 मार्च 2024 ला फिर्यादी व तिचे पती घरी असताना परिसरातील एक व्यक्ती त्यांच्या घरी आला. त्याने फिर्यादी व तिच्या पतीला त्याच्या मोबाईलमध्ये आरोपी हा पीडितेसोबत शरीर संबंध करत असल्याचा, तसेच दुसरा आरोपी हा मोबाईलमध्ये चित्रीकरण काढत असल्याचा व नंतर दुसरा आरोपी पीडितेसोबत अत्याचार करीत असल्याचा व्हिडिओ दाखविला.
व्हिडिओ पाहिल्यानंतर फिर्यादीने व तिच्या पतीने पीडितेकडे त्याबाबत चौकशी केली असता पीडितेने त्यांना सांगितले की, एक महिन्यापूर्वी ती शाळेतून घरी आली. त्यावेळी फिर्यादी घरी आलेली नसल्याने जवळच राहणारा आरोपी युवराज हा पीडितेला म्हणाला, तुझी मम्मी घरी आली नाही. तू आमच्या घरी चल, असे म्हणून आरोपी युवराज हा पीडितेला त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने दुसरा आरोपी संतोष यालाही बोलावून घेतले. त्यानंतर दोघांनी मिळून पीडितेवर अत्याचार केला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात वरील दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी घटनेचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
परिसरातील व्यक्ती, श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोजकुमार शिंदे, न्याय सहायक प्रयोगशाळा नाशिकचे सहायक संचालक नीलेश पाटील, पंच लक्ष्मण वाकळे व आकाश घोडके, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण व ग्राह्य धरण्यात आल्या. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता केदार केसकर यांनी कामकाज पाहिले. त्यांना मदतनीस म्हणून अॅड. अनिकेत भोसले यांनी मदत केली. हे प्रकरण चालविण्यासाठी जिल्हा सरकारी अभियोक्ता सतीश पाटील यांनी मार्गदर्शन व पोलीस दत्तात्रय शिरसाठ, संतोष साबळे, नितीन नरोटे, नामदेव रोहोकले, महिला पोलीस आशा खामकर, सुजाता गायकवाड यांनी मदत केली.