अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याची घटना ताजी असतानाच आणखी दोन अल्पवयीन मुलींचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस मुलींचा शोध घेत आहेत. भिवंडी येथे राहणार्या 33 वर्षीय महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे की, त्यांच्या 15 वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. फिर्यादीची मुलगी अहिल्यानगर शहरातील एका हायस्कूल मध्ये शिक्षण घेत असून तेथील वसतिगृहात राहत होती.
दरम्यान, रविवारी सायंकाळी 6 वाजता फिर्यादी मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी तारकपूर बस स्थानकला आणले. तेथून मुलीचे अपहरण झाले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादीने बस स्थानक परिसरात शोध घेतला तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली, परंतु मुलगी कुठेही सापडली नाही. त्यामुळे मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय त्यांच्या मनात निर्माण झाला.
केडगाव उपनगरातील 40 वर्षीय महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांच्या 16 वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे कुटुंब केडगावातील एका विटभट्टीवर मजुरी करून उपजीविका भागवितात. शुक्रवारी फिर्यादी कामावर गेल्या होत्या. घरात त्यांच्या दोन मुली होत्या. सायंकाळी 5 वाजता कामावरून परतल्यानंतर त्यांनी रात्री 9 वाजता मुलींशी जेवण करून झोप घेतली. मात्र, शनिवारी सकाळी 6 वाजता उठल्यावर त्यांची एक मुलगी घरी दिसली नाही. यानंतर मुलीचा शोध घेतला गेला, परंतु ती मिळाली नाही. त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
युवती बेपत्ता
येथील क्लेरा ब्रुस ग्राऊंडच्या परिसरातून 21 वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. सोमवारी (20 जानेवारी) सकाळी 11:15 वाजता तिने घरी जाते असे सांगून निघून गेली. परंतु ती घरी पोहोचली नाही. तिच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून नोंद करण्यात आली आहे.