करजगाव । वार्ताहर
नेवासा तालुक्यातील मुळाकाठ परिसरातील पानेगाव आणि शिरेगाव येथील विटभट्टीवरून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची सोनई पोलिसांनी अवघ्या 18 तासांत सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
16 एप्रिल 2025 रोजी या मुली बेपत्ता झाल्या होत्या. सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तातडीने कारवाई करत पुलतांबा परिसरातून मुलींची सुटका केली. पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली.
या घटनेनंतर सोनई पोलिसांनी अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय तुकाराम माळी (वय 24, रा. शिरेगाव) आणि आकाश मधुकर बर्डे (वय 27, रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
सुटका केलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिसांनी तपास तीव्र केला असून, आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.