Saturday, July 27, 2024
Homeनगरजिल्हाधिकार्‍यांनी तातडीने बैठक घ्यावी - आ. काळे

जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने बैठक घ्यावी – आ. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. या निधीतून बहुतांश विकास कामे पूर्ण झाली असून अनेककामे प्रगतीपथावर आहेत. मात्र मागील काही आठवड्यांपासून गौण खनिज व खडीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ही कामे थांबलेली आहे. या विकास कामांना गौण खनिज व खडीचा नियमित पुरवठा व्हावा यासाठी तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.

- Advertisement -

या निवेदनात आ. काळे यांनी म्हटले आहे, कोपरगाव मतदार संघात अनेक विकास कामे सुरू आहेत. यामध्ये प्रशासकीय इमारती, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची निवासस्थान, धार्मिक स्थळे, दळणवळणासाठी आवश्यक असणारे रस्ते निर्मिती व दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे. ही कामे मागील काही दिवसापासून गौण खनिज व खडीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ठप्प झाली आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत असून नागरिकांकडून सातत्याने विचारणा होत आहे.

या संदर्भात संबंधित ठेकेदारांकडून माहिती घेतली असता गौण खनिज व खडी मिळत नसल्यामुळे कामे थांबली असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी इतर जिल्ह्यात माहिती घेतली असता त्या जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसून अपेक्षित असलेला गौण खनिज व खडीचा पुरवठा वेळेवर होत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र नगर जिल्ह्यातच खडीचा पुरवठा कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुरु असलेल्या विकास कामांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. गौण खनिज व खडीचा पुरवठा होत नसल्यामुळे दुष्काळी गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे कालव्यांची प्रगतीपथावर असलेली कामे देखील थांबली आहेत.

यामुळे शासनाप्रती नागरिकांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण होत आहे त्यामुळे याबाबत तातडीने बैठक घेवून हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. अन्यथा स्थानिक नागरिकांकडून जनआंदोलन व उपोषण केले जावू शकते. या सर्व परिस्थितीचा आपण गांभीर्याने विचार करून गौण खनिज व खडीच्या होत असलेल्या अनियमित पुरवठ्याबाबत तातडीने बैठक घ्यावी. त्या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती मिळावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या