Friday, October 18, 2024
Homeमुख्य बातम्या'त्या' घटनेनंतर जरांगे निघून गेले होते, पण राष्ट्रवादीतील दोन नेत्यांनी…; मंत्री छगन...

‘त्या’ घटनेनंतर जरांगे निघून गेले होते, पण राष्ट्रवादीतील दोन नेत्यांनी…; मंत्री छगन भुजबळांचा गंभीर आरोप

नाशिक | Nashik
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी अंतरवली सराटीतील मराठा आंदोलनाबाबत खळबळजनक दावा केला आहे. जालन्यातील अंतरवली सराटीत जेव्हा मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता तेव्हा मनोज जरांगे पाटील तिथून निघून गेले होते. पण नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांना तिथं आणून बसवले असा आरोप भुजबळांनी केला. छगन भुजबळ यांनी यात रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्यावर आरोप केले असून या लोकांनी पवार साहेबांना तिथे बोलावले. मग पवार साहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले. खरी माहिती जी आहे. त्याची त्या दोघांना कल्पना नव्हती, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

यावेळी छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटीतील दगडफेक आणि लाठीचार्जच्या घटनेबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, माझ्या माहितीप्रमाणे अंतरवलीत ज्यावेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे तिथून निघून गेले होते. परंतु, रात्री दोन वाजता रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांना पुन्हा तिकडे आणून बसवले.

- Advertisement -

यानंतर तिकडे शरद पवार गेले, मग उद्धव ठाकरे हेदेखील तिकडे गेले. पवार आणि उद्धव ठाकरेंना पोलिसांवर दगडफेक झाल्याची कल्पना नव्हती. ८० पोलिस जखमी झाले आहेत. त्यामध्ये महिला पोलिस देखील होत्या. ते रुग्णालयात अ‍ॅडमीट झाले होते. स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठीहल्ला केला.’, असे देखील भुजबळ म्हणाले.

मात्र, रोहित पवार आणि राजेश टोपे हे दोन्ही नेते अंतरवाली सराटीत आल्याने काय घडलं तर प्रसारमाध्यमांसमोर या प्रकरणातील एकच बाजू समोर आली. याचा फायदा पुढे मनोज जरांगे पाटील यांना झाला. मात्र, अंतरवाली सराटीमध्ये घडलेल्या दगडफेकीत रोहित पवार आणि राजेश टोपे यांचा वाटा आहे, असे तेथील लोक सांगत असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले.

मनोज जरांगेंकडून भुजबळांवर पलटवार
भुजबळांनी यांनी केलेल्या आरोपानंतर विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. मनोज जरांगे यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, भुजबळ हे चमत्कारीत बाबा आहेत. भुजबळांनी दंगली घडवून आणू नये. म्हतारपणात जी मस्ती आली आहे? ती येऊ देऊ नको. दंगलीचे पाप येऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या वयाचा विचार करा. ओबीसी-मराठ्यात वाद लावू नको.

छगन भुजबळांना वेड लागलय. त्यांना आरोप करण्यापलिकडे काय करता येत नाही. आरोप करतोय तर सिद्ध करा. देवेंद्र फडणवीसांची शक्ती तुमच्यामागे आहे. त्याच आम्ही आता काही मनावर घेत नाहीत. सध्या देवेंद्र फडणवीसचे आमदार म्हणत आहेत, सध्या मणिपूरसारखी परिस्थिती होणार आहे. यांना शिक्कामोर्तब केलाय, दंगली घडवून निवडणुका लढवायच्या आहेत.

छगन भुजबळ महापापी माणूस आहे. गोरगरिब मराठ्यांमध्ये आणि ओबीसीमध्ये याला दंगली घडवायच्या आहेत. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आमच्या आंदोलनापुढे आंदोलन आणून बसवणार आहेत. हे महापाप या वयात तो करायला लागलाय. आपण किती ज्येष्ठ आहोत, पक्षात किती मोठे आहोत. आपण विचारांची मांडणी किती पुरोगामीपणाने केली पाहिजे. हे त्याच्या लक्षात नाही, त्याला फक्त दंगली घडवायच्या आहेत. सरकार तुझ्याकडे तू चौकशी कर. मी असं म्हणालो तर तूच माघारी आणलं आणि मला बसवलं, असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या