कर्जत |प्रतिनिधी| Karjat
तालुक्यातील मिरजगाव येथे सोमवारी(दि.26) स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत गावठी कट्ट्यासह एका तरुणास ताब्यात घेतले आहे. गुप्त बातमीदारामार्फत मिरजगाव (ता. कर्जत) शिवारातील क्रांतीसूर्य महात्मा फुले पुलाखाली एक इसम विनापरवाना गावठी कट्टा बाळगून थांबलेला असल्याची माहिती सोमवारी पोलीसांना मिळाली.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग तसेच पोलीस अंमलदार हृदय घोडके, भिमराज खर्से, शामसुंदर जाधव, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे व महादेव भांड यांच्या पथकाने पथकाने मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, पोलीस अंमलदार सुनील खैरे, समीर सय्यद व अशोक रक्ताटे यांना मदतीसाठी बोलावून संयुक्तपणे कारवाई केली. घटनास्थळी खात्री केली असता पुलाखाली एक संशयित इसम आढळून आला.
त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव संग्राम सुनील जगताप (वय 23, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) असे सांगितले. पंचासमक्ष झडतीदरम्यान त्याच्या कब्जातून 35 हजार रुपये किमतीचा एक गावठी पिस्तूल (अग्निशस्त्र) तसेच 3 हजार रुपये किमतीची तीन जिवंत काडतुसे असा एकूण 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार भाऊसाहेब राजू काळे फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला.





