मुंबई | प्रतिनिधी Mumbai
सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन बाजारभावापेक्षा दुप्पट-तिप्पट जादा दराने खरेदी केली. ४५ ते ५० लाख रुपयांची एक व्हॅन ९९ लाख रुपयांना खरेदी करण्यात आली असून यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केला. या आरोपानंतर हे अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांनी सरकारला दिले.
कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन खरेदीबाबत भास्कर जाधव यांनी आज तारांकित प्रश्न विचारला होता. व्हॅनची मूळ किंमत त्यावरील फॅब्रिकेशन, उपकरणे असा एका व्हॅनचा खर्च ४५ ते ५० लाख रुपये अपेक्षित असताना पुरवठादार कंपनीबरोबर संगनमत करून वाहन खरेदी करताना सर्व नियमाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे काय?असा सवाल भास्कर जाधव यांनी केला. तर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार या चर्चेत भाग घेताना, एका व्हॅनची किंमत ४० लाख रुपयांपेक्षा अधिक होऊ शकत नाही. या व्हॅनमधील यंत्र १२ लाख रुपयांपेक्षा अधिक नाही. वाहने खरेदी करताना अधिकच्या किंमतीने घेण्यात आली. या व्हॅनमधील काही यंत्रे बंद आहेत. याबाबत चौकशी सुरु आहे तर मग अजून अहवाल का आलेला नाही, असा सवाल त्यांनी केला.
यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी कर्करोगाचे निदान वेळेवर होऊन कर्करुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी राज्यात आठ कर्करोग निदान व्हॅनची खरेदी करण्यात आली. ही खरेदी जेम पोर्टलवर स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून करण्यात आल्याचा खुलासा केला. या खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याबाबत लोकप्रतिनिधी यांनी पत्र दिले आहे. त्यानुसार आयुक्त, आरोग्य सेवा यांच्यामार्फत सखोल चौकशी करून अधिवेशन संपण्याच्या आत अहवाल सादर करण्यात येईल, असेही बोर्डीकर यांनी सांगितले.
पण राज्यमंत्र्यांच्या या उत्तरावर विरोधी पक्षाच्या आमदारांचे समाधान झाले नाही. अखेरीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या चर्चेत हस्तक्षेप करत चौकशी समितीने अधिवेशन संपण्यापूर्वी अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.




