अहमदनगर । प्रतिनिधी
नगर-मनमाड रस्त्याच्या दुरूस्तीबाबत पालकमंत्र्यांकडून दिशाभूल सुरू असून, आपलेच घोडे पुढे दामटण्याचा प्रकार त्यांच्याकडून सुरू आहे, असा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून आपण मंजूर करून आणलेल्या सुमारे 9 कोटी रूपये निधीतूनच रस्त्याची दुरूस्ती होणार असल्याचा दावाही खा. लंके यांनी केला.
खा. लंके यांनी गुरूवारी सायंकाळी नगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना पालक मंत्री विखे पाटील यांच्यावर टीका केली. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे, गिरीश जाधव आदी उपस्थित होते.
खा. लंके म्हणाले, नगर-मनमाड व नगर-पाथर्डी या रस्त्यांच्या कामासाठी 5 डिसेंबर 2022 रोजी उपोषण केल्यावर नगर-पाथर्डी रस्त्याचे काम आपण करवून घेतले. नगर-मनमाड रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्याने पालकमंत्री व त्यांचे चिरंजीव यांनी तो करवून घेणे अपेक्षित होते. पण सहा वर्षांपासून रस्ता खोदून ठेवला होता. ठेकेदाराकडे खंडणी मागितली जात असल्याचा आरोपही त्यावेळी त्यांनी केला होता.
हे ही वाचा : जगताप समर्थक व सातपुतेंमध्ये सक्कर चौकात राडा
मात्र, हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा नव्हता. आमदार म्हणून आमचा त्याच्याशी संबंध नव्हता. तरीही मतदार संघातून जात असल्याने या रस्त्याचा संबंध असलेल्या मी वा प्राजक्त तनपुरे आम्ही पैसे मागितल्याचा आरोप खरा ठरला तर आमदारकीचे राजीनामे देतो, असे आव्हान दिले होते. पण त्यावर पिता-पुत्रांनी काहीच उत्तर दिले नाही, असा दावाही खा. लंके यांनी केला. पालकमंत्र्यांनी बैठक घेतली असली तरी इतक्या दिवस काय केले हा सवाल आहे. नुसता ड्रामा सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी त्यांनी पाठपुरावा केल्याचे एक तरी पत्र दाखवा, असे आव्हानही खा. लंके यांनी दिले.
दीडशे कोटी वळवले
खासदार झाल्यावर 19 जूनला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन मुळा प्रकल्प व उजव्या कालव्याच्या दुरूस्तीसाठी निधीची मागणी केली होती. त्यावर नाबार्डने 150 कोटी मंजूर केले. त्यामुळे राहुरी, पाथर्डी, शेवगाव व नेवासा या चार तालुक्यांतील सिंचन सुविधा मार्गी लागणार होत्या. या कामाची निविदाही निघाली आहे व निधीही वितरित होत आहे. मात्र, पालकमंत्र्यांनी बेकायदेशीरपणे हा निधी दारणा खोर्याकडे वळवला, असा आरोपही खा. लंके यांनी केला.
हे ही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर माफी मागत म्हणाले, शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो…
भिंगारसाठी सुमारे 200 कोटीचा विकास प्रकल्प
भुयारी गटार व ड्रेनेज सिस्टीमचा अभाव, मोकाट फिरणारी डुकरे, डासांचे साम्राज्य, शासकीय दवाखान्यात औषधे व गोळ्यांचा अभाव, अशा गर्तेत सापडलेल्या भिंगार कॅन्टोन्मेंट परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून सुमारे दीडशे ते दोनशे कोटींचा विकास प्रकल्प आराखडा करण्यात येणार आहे, अशी माहिती खा. लंके यांनी दिली. यासंदर्भात कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकार्यांना सूचना दिल्या असून, त्यांच्याव्दारे प्रकल्प आराखडा केला जाणार आहे व येत्या 8 दिवसात याबाबत स्वतंत्र बैठक घेतली जाणार आहे, असेही खा. लंके यांनी सांगितले.
हे ही वाचा : चोरट्याची हिंमत तर पहा… भरदिवसा घरात घुसून महिलेला लुटले!