संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील युवकांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीचा स्वतंत्र प्रकल्प शासनाने मंजूर करावा. शेतकर्यांची गरज लक्षात घेऊन कृषी प्रक्रिया उद्योग आणि शितगृहाची उभारणी करावी आणि पुणे नाशिक रेल्वे मार्ग प्रस्तावित आराखड्याप्रमाणे संगमनेरातून व्हावा, अशा मागण्या आ.अमोल खताळ यांनी विधानसभेत केल्या आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर आभारदर्शक ठरावाच्या चर्चे दरम्यान आ.खताळ यांनी राज्याच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, त्यादृष्टीने होत असलेल्या निर्णयाचे आणि धोरणांचे त्यांनी स्वागत केले. महाराष्ट्र राज्य हे देशाच्या आर्थिक विकासाचा स्तंभ असून राज्याला औद्योगीक विकास, कृषी परंपरा मोठी आहे. त्याला गती देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होत असल्याचे समाधान आ.खताळ यांनी व्यक्त केले.
महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात स्वतंत्र औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी करून आ.खताळ म्हणाले, औद्योगिक गुंतवणुकीच्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य आकर्षक ठरत आहे. एकूण 15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्याच्या उद्योग क्षेत्रात होत असल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच संगमनेर तालुक्यात औद्योगिक वसाहत मंजूर झाल्यास तालुक्यातील युवकांना रोजगारांच्या संधी निर्माण होऊ शकतील. तालुक्यात कृषी परंपरा मोठी असून पारंपरिक पिकांच्या उत्पादनाबरोबरच कृषी प्रक्रिया उद्योग आणि शीतगृहाची उभारणी झाल्यास शेतकर्यांना त्याचा मोठा लाभ होईल, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. राज्य सरकाराने मागेल त्याला सौरपंप योजना सुरू केली. यामुळे विजेच्या प्रश्नावर शेतकर्यांना मोठा दिलासा मिळेल. तालुक्यातील शेतकर्यांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र डार्क झोनची अट सांगून शेतकर्यांची होणारी अडवणूक आणि भूजलचे दाखले देण्याची अट शिथिल करावी, अशी मागणी आ.खताळ यांनी आपल्या भाषणात केली.
तालुक्यातील सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने वाहतूक व्यवस्था सुरळीत होणे गरजेचे आहे. यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ पठारे हे संगमनेर मतदार संघातील असल्याचे त्यांच्या सन्मानासाठी राज्य सरकारने त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम संगमनेर येथे होण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना आ.खताळ यांनी आपल्या भाषणात केली.