अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी गुरूवारी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा, नगर तालुका आणि नगर शहरात दौरा केला. आ. थोरात यांच्या या दौर्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आ. थोरात यांच्या नावाची अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार म्हणून चर्चा आहे. मात्र, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार रिंगणात राहणार असून ही जागा महाविकास आघाडी ताकदीने लढणार असल्याचे आ. थोरात यांनी ‘सार्वमत’ शी बोलताना सांगितले.
गुरूवारी आ. थोरात यांनी नगर शहरातील काँग्रेस कार्यालयाला भेट दिली. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माथाडी काँग्रेस कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे यांनी आ. थोरात यांची भेट घेत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून आ. थोरात यांनी उमेदवारी करावी व नगर शहर विधानसभेची जागा काँग्रेसकडे घ्यावी, असा आग्रह धरला.
त्यानंतर आ. थोरात यांनी नगर तालुक्यातील खडकी गावात त्यांनी कांदा, दुधाच्या प्रश्नासंदर्भात शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकर्यांच्या भावना जाणून घेतल्या. शेतकरी हिताची आक्रमक भूमिका काँग्रेस घेईल, असे आश्वासन यावेळी त्यांनी शेतकर्यांना दिले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी व्हॉईस चेअरमन संपतराव म्हस्के, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ, लेबर फेडरेशनचे जयंत वाघ, नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरूण म्हस्के, खडकीचे राहुल बहिरट यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील सोसायटीच्या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यास त्यांनी हजेरी लावली.
दरम्यान, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील दौर्याबाबत आ. थोरात यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील खडकी येथील कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर सोसायटीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमानुसार यापुढे जिल्हाभर दौरे वाढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, उत्साही कार्यकर्त्यांकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रह धरण्यात येत आहे. दुसरीकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात माझे नाव का येते हे कळत नाही, असे सांगत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार राहणार असून ही जागा महाविकास आघाडी ताकदीने लढवणार असल्याचे सुचक वक्तव्य केले आहे. यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सस्पेन्स वाढला आहे.
थोरात यांच्या दौर्यादरम्यान नगर शहरात किरण काळे यांच्यासह ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, बाबासाहेब वैरागर, दीपक काकडे, विजयराव शिंदे, जयराम आखाडे, आकाश भोस, अमर डाके, राधेश भालेराव, गोरख जाधव, दिनेश निकाळजे, किशोर ढवळे, सुनील नरसाळे, नाना दळवी, विनोद केदारे, राजेंद्र तरटे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.