Saturday, July 27, 2024
Homeनगरतिनही पक्षांतील चर्चेअंती ‘नगर’चा निर्णय

तिनही पक्षांतील चर्चेअंती ‘नगर’चा निर्णय

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील लोकसभेच्या 48 जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीचा अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. नगर लोकसभेसह राज्यातील जागांबाबत महाविकास आघाडीच्या तिनही पक्ष विचार करून उमेदवार ठरवू. नगर लोकसभेबाबत मी उमेदवार नाही, यामुळे या विषयावर आत्ताच बोलणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली. दरम्यान, राज्यातील शिंदे- फडवणीस सरकारने दीड वर्षात मराठा आरक्षण समितीची एकदाही बैठक घेतली नाही. आरक्षणाच्या विषयावर सरकारकडून संवाद होणे अपेक्षीत होते. मात्र, हा संवाद का झाला नाही, असा सवाल करत हे म्हणजे आरक्षण प्रश्नाची एका प्रकारे अवहेलना असल्याची टीका आ. थोरात यांनी केली.

- Advertisement -

नगरच्या शासकीय विश्रामगृहावर आ. थोरात यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नगर लोकसभा मतदारसघांतून निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून आपणास केली जात आहे, असा प्रश्न आ.थोरात यांना विचारण्यात आला. त्यावर आ. थोरात म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीत आहोत. तीन पक्ष महाविकास आघाडीत असून आम्ही एकत्र येऊन ही जागा कोण लढवणार याबाबत निर्णय घेऊ. आताच या विषयावर बोलणे उचित ठरणार नाही. राष्ट्रवादीकडून नगर लोकसभा जागा आम्हीच लढवणार असा दावा केला जातो आहे, असे विचारले असता यावर आ.थोरात म्हणाले, नगर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीकडे होतीच म्हणून ते म्हणत असतील. मात्र, जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. लवकरच बैठक होऊन निर्णय होईल, अनेक गोष्टी पुढे येतील. त्यानंतर त्यावरती बोलणे योग्य ठरेल.

मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर लाठीचार्ज का करण्यात आला, याचा खुलासा अद्यापि सरकारने केलेला नाही. दीड वर्षात सरकारने मराठा आरक्षण समितीची बैठक घेतली नाही. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यावर सरकारला जाग आली. ही मराठा समाजाची अवहेलनाच ठरते. सरकार समाजाला गृहीत धरते आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच मराठा आरक्षणाचा विषय प्राधान्यक्रमावर का घेतला नाही, असाही प्रश्न थोरात यांनी केला. राज्य सरकार खोटे आश्वासन देणारे आहे. धनगर समाजाला 2014 मध्ये सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण लागू करण्याचे जाहीर केले होते, अशा फसवणुकीमुळे सरकारला वेगवेगळ्या प्रश्नांना तोंड द्यावे, लागत आहे, असेही थोरात म्हणाले.

पालकमंत्र्यांवर टीका

पंतप्रधानांच्या शिर्डी येथे गुरूवारी होणार्‍या कार्यक्रमासाठी गर्दी जमवण्याची सक्ती प्रशासनावर का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित करत थोरात यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यपध्दतीवर नाव न घेता टीका केली. अशा प्रकारे सक्तीने गर्दी जमवणे पंतप्रधान मोदी यांना निश्चितच आवडणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधानांच्या दौर्‍यासाठी निळवंडे धरणाचे 10 टीएमसी पाणी अडवून धरले, त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना टंचाईचा सामना करावा लागतो आहे असा आरोपही त्यांनी केला. शिर्डीतील दर्शन रांग दीड वर्षांपूर्वीच तयार झाली, मात्र पंतप्रधानांसाठी तिचे उद्घाटन उशिरा करत भाविकांना उन्हात ताटकळत ठेवले गेले, असाही आरोप थोरात यांनी केला. निळवंडे धरणासाठी 1992 पासून आंदोलने झाली. कोणाच्या कार्यकाळात हे धरण पूर्ण झाले हे जनतेला माहित आहे. आता कालव्यांचे राहिलेले काही काम झाले. निळवंड्याच्या कालव्यातून मध्यंतरीच्या काळात पाणी ही सोडण्यात आले होते. दुष्काळी परिस्थितीमध्ये निळवंडेचे पाणी देण्याऐवजी पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटनासाठी हे पाणी बंद केले. शेतकर्‍यांच्या खरीप हंगामातील पिके जळाली आहेत. पावसाळ्याच्या काळात या भागातील लहान-मध्यम तलाव भरून घेता आले असते. यामुळे जनतेला दुष्काळाशी सामना करण्याची वेळ आली नसती, असे आ. थोरात यावेळी म्हणाले. राज्यातील ड्रग्ज माफी यांना सरकार पाठीशी घालत आहे, असा आरोप करून आ. थोरात म्हणाले की, यामुळे संपूर्ण पिढी बरबाद होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने लक्ष देऊन लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

‘समन्यायी’चे तत्त्व मान्य; सूत्र अमान्य

नगर, नाशिकच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यावरून सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहे. यावर थोरात यांनी भाष केले आहे. ते म्हणाले, जायकवाडीला पाणी सोडण्याचे समन्यायी तत्त्व आम्हाला मान्य असले तरी पाणी सोडण्यासाठी आवश्यक असणारे सूत्र मात्र आम्हाला मान्य नाही. तत्कालिन परिस्थितीत ज्यावेळी सूत्र ठरले, त्यावेळी निवडणुका लागलेल्या होत्या, राज्यात ‘अधिकारी राज’ होते. अधिकार्‍यांनी ते सूत्र ठरवले ते मान्य नाही, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.

कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

नगर शहरातील वाढती गुंडगिरी पाहता सरकारचे अस्तित्व येथे दिसत नाहीत असा आरोप करून आ. थोरात म्हणाले, नगरच्या गुंडगिरीचा विषय मी विधानसभेत उपस्थित केला होता व येथील दहशतीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. परंतु अजूनही गुंडगिरी कायम दिसते आहे. प्रशासनाने ती थांबवावी. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात अवैध व्यवसाय सुरू राहणार नाहीत याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली. प्राचार्य हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध यावेळी आ. थोरात यांनी केला. तसेच भविष्यात असे प्रकार न होता, शहरातील गुंडगिरी, दहशतीचा बंदोबस्त करण्याचे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले.

जिल्हा बँकेने शिस्त पाळावी

जिल्हा बँकेच्या कारभारावर टीका करताना आ. थोरात म्हणाले, संचालक मंडळाच्या परदेश दौर्‍यावर आपण बोलणार नाही, मात्र बँकेची आर्थिक शिस्त जपली पाहिजे, बँकेच्या अध्यक्षांनी ती काळजी घ्यायला हवी. जिल्हा बँक ही जिल्ह्यातील महत्वाची आर्थिक संस्था आहे. जिल्ह्याच्या विकासात जिल्हा बँकेचे मोठे महत्व आहे. यामुळे या ठिकाणी काम करणार्‍या संचालक मंडळ आणि पदाधिकारी यांनी काळजी घ्यायला हवी, असे सुचक इशारा त्यांनी यावेळी दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या