Friday, November 15, 2024
Homeनगरसाठ वर्षात विकास आताच कसा आठवला ?

साठ वर्षात विकास आताच कसा आठवला ?

आ. थोरात यांची महसुलमंत्री विखे पाटील यांच्यावर टीका

राहाता |प्रतिनिधी| Rahata

साठ वर्षापासून तुमच्या कुटुंबियाकडे सत्ता आहे, मग तुम्हाला याआधीच विकास कामांची आठवण का आली नाही? नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विकास कामे केली असा दावा तुम्ही करता, मग तेथील जनतेने तुम्हाला का नाकारले असा प्रश्नांचा भडीमार करत काँग्रेसचे नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी साकुरी येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीकेची तोफ डागली.

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. आ. बाळासाहेब थोरात यांनी यावेळी प्रश्नांचा भडीमार केला. गणेश सहकारी साखर कारखाना, राहुरी कारखाना व बाभळेश्वर दूध संघ यासारख्या चांगल्या संस्था का बंद पडल्या? स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलले, सहकारी संस्था मोडकळीस आणल्या, अशी टीका करत यावेळी राहाता मतदारसंघात परिवर्तन नक्की होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या सरकारला धडा शिकवून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणायचे आहे. शिर्डी मतदारसंघातील जनतेला गुलामी व दहशतीच्या राजकारणातून मुक्त करायचे आहे. गणेश कारखाना निवडणूक व नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत आपण दहशतीचे झाकण उडवले. आता उर्वरित काम या निवडणुकीत सर्वांनी मिळून करायचे आहे. संगमनेर तालुक्यात आम्ही कधीही विरोधकांना त्रास दिला नाही. विनाकारण कुणाला वेठीस धरणे आम्हाला जमत नाही. शिर्डीला एमआयडीसी करणार आहे असे ते आता सांगतात. त्यांच्याच कुटुंबाकडे मागील साठ वर्षे सत्ता होती. आजोबा खासदार, आमदार होते मग काम का झाले नाही? आयटी पार्कच्या आश्वासनाचे काय झाले, याचे चिंतन करा असा सल्ला त्यांनी दिला.

नगर-मनमाड रस्ता किती वर्षे नादुरुस्त आहे, याला जबाबदार कोण? रस्त्याचे काम करणारे ठेकेदार का पळून जातात, त्यांना कोणी त्रास दिला? महाराष्ट्र शेती महामंडळाची जमीन मी महसूलमंत्री असताना वाटप करून दिली. ते काम 60 वर्षे प्रलंबित होते. या कामात आडवा कोण आला, असे सवाल त्यांनी केले. या भागाला निळवंडे धरणाचे पाणी आले आहे. त्यामुळे आता समृद्धी आली आहे. निळवंडे धरण व कालव्याच्या कामात यांची कवडीची मदत नाही. अलिकडच्या काळात जमीन व्यवहारात किती भ्रष्टाचार आहे हे जनतेला समजले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या