Saturday, July 27, 2024
Homeनगरलाठीमारानंतरच्या माफीला अर्थ नाही

लाठीमारानंतरच्या माफीला अर्थ नाही

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आधी लाठीमार केला, नंतर माफी मागितली. याला काही अर्थ नाही. मराठा आरक्षण देणे हाच त्यावरचा उपाय आहे. गेल्यावर दीड वर्षात मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकच राज्य सरकारने घेतली नाही, यावरून सरकार हा विषय गांभीर्याने घेत नाही असेच दिसते, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.

- Advertisement -

काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील जनसंवाद यात्रेचा प्रारंभ नगर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातून करण्यात आला. यानंतर तये माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, कोणाचा राजीनामा मागणे हा आमचा उद्देश नाही तर आरक्षण मिळणे हा उद्देश आहे. लाठीमार करण्याचे कारण काय? याचा शोध घेतला पाहिजे. लाठीमार घडला की घडवला याबद्दल संशय आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून काही सूचना होत्या का हे तपासले पाहिजे. पुन्हा कोणी आंदोलन करू नये अशी सरकारची इच्छा दिसते, अशी टीकाही आ. थोरात यांनी केली.

जनमाणसात ‘इंडिया’चा प्रभाव वाढत असतानाच हा प्रकार घडला, त्यामुळेच तो घडला की घडवला याचा संशय वाटतो. केवळ जालन्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांना सुट्टीवर पाठवून चालणार नाही, त्यांना आदेश कोणी दिला होता याचाही शोध घेतला पाहिजे. इंडियाचा प्रभाव वाढत असल्याने सरकार आता घाबरू लागले आहे. त्यांना सत्तेत राहण्याची काळजी वाटते आहे. त्यामुळेच ते सत्तेवर राहण्यासाठी नवे मार्ग शोधत आहेत. त्यातूनच मवन नेशन-वन इलेक्शनफ असे प्रयोग पुढे आणले जात आहेत, अशीही टीका त्यांनी केली. वन नेशन-वन इलेक्शन ही संकल्पना पूर्वीची असली तरी ती सध्या कितपत व्यवहार्य आहे हे तपासले पाहिजे, असे आ. थोरात म्हणाले.

शक्तीप्रदर्शन फसले

काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील जनसंवाद यात्रेची सुरुवात नगरमधून करण्यात आली. मात्र यानिमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्याचा काँग्रेसचा बेत फसला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोजकेच पदाधिकारी यात्रेसाठी उपस्थित होते. शहरातील बहुसंख्य पदाधिकार्‍यांनी या यात्रेकडे पाठ फिरवली. अनेक कार्यकर्त्यांना या यात्रेची कल्पनाही नव्हती. सुरुवातीला भुईकोट किल्ल्यानंतर शहरातून पदयात्रा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र अल्प उपस्थिती लक्षात घेऊन जवळच्या मार्गाने वाहनातून यात्रा नेण्यात आली. ग्रामीण काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र नागवडे यांची नियुक्ती झाल्यानंतर पहिलाच पक्ष कार्यक्रम होता, मात्र नियोजनाअभावी या कार्यक्रमाचा बोजवारा उडाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या