संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
चुकीची कामे करण्यासाठी मंत्रालयातून येणारा दबाव अधिकार्यांचे बळी घेत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर केला आहे. जळगाव जिल्हा महिला बालकल्याण विभागात अधिकारी असलेल्या मयुरी राऊत-कर्पे या त्यांच्या पतीला दवाखान्यात घेऊन गेलेल्या होत्या. त्यावेळी मयुरी राऊत यांचाच हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत दाम्पत्याबाबत घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आहे. मंत्रालयाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकार्यांना आदेश देऊन, ते राबविण्यासाठी जे दबावतंत्र महाराष्ट्रात सुरू आहे त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली आहे. मंत्रालयाच्या माध्यमातून नेमकं कोण आदेश देत होते? कोणत्या वरिष्ठ अधिकार्यांचा दबाव होता? या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार थोरात यांनी केली आहे.