Monday, November 25, 2024
Homeनगरकेंद्र व राज्य सरकार आदिवासी व बहुजनांच्या विरोधी - आ.थोरात

केंद्र व राज्य सरकार आदिवासी व बहुजनांच्या विरोधी – आ.थोरात

कोळवाडे येथे गांधी जयंतीनिमित्त भव्य आदिवासी मेळावा

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिला बसावी, हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्वप्न होते. यासाठी काँग्रेसने वंचित बहुजन आदिवासींच्या विकासासाठी कायम काम केले. मात्र मणिपूर मधील आदिवासी महिलांवर अत्याचार, राम मंदिर व नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला महामहिम राष्ट्रपती महोदयांना न बोलवणे, या विचारांचे लोक सत्तेवर असून सध्याचे केंद्र व राज्य सरकार ही आदिवासी गरीब आणि बहुजन यांच्या विकासाच्या विरोधी असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केली असून आदिवासी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisement -

कोळवाडे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती व जयहिंद आदिवासी आश्रम शाळेच्या 30 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आ. डॉ.सुधीर तांबे होते तर व्यासपीठावर सौ. दुर्गाताई तांबे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, डॉ.जयश्रीताई थोरात, आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष लकी जाधव, बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, मिलिंद कानवडे, अजय फटांगरे, विष्णूपंत रहाटळ, संपतराव डोंगरे, राजेंद्र चकोर, सिताराम वरपे, अर्चनाताई बालोडे, प्रा. बाबा खरात, पुनम माळी, काशिनाथ गोंदे, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, सरपंच पुष्पा गुंजाळ, बाबुराव गोंदे, सोपान वर्पे आदींसह परिसरातील पदाधिकारी उपस्थित होते.

आ.थोरात म्हणाले, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या या आदिवासी आश्रम शाळेने राज्यात गुणवत्तेने कायम प्रथम क्रमांक मिळवला असून या शाळेमुळे अनेक कुटुंबांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला आहे. आदिवासी बांधवांसाठी श्रीमती सोनिया गांधी यांच्या पुढाकारातून 2006 मध्ये वन जमिनी बाबतचा कायदा झाला आणि आपण महसूल मंत्री असताना आदिवासींची नावे त्या उतार्‍यावर आली. काँग्रेसने कायम आदिवासी व गोरगरिबांच्या विकासाचे काम केले असून सध्याचे भाजप आघाडी सरकार मात्र बहुजनांच्या आणि आदिवासींच्या विरोधात आहे. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाले. मणिपूर पेटते आहे. अशावेळी पंतप्रधानांना मणिपूरमध्ये भेट देण्यासाठी वेळ नाही.

तर मोठी जाहिरातबाजी करून उभारलेले राम मंदिर व नवीन संसद भवन यांच्या उद्घाटनासाठी देशाच्या महामहीम राष्ट्रपतींना बोलावले नाही. यावरून हे सरकार कोणत्या विचारांचे आहे हे लक्षात घ्या. सरकारच्या घोषणा फक्त निवडणुकीपुरत्या आहेत. यांच्या कोणत्याही घोषणांना फसू नका. यांना बहीण लाडकी नसून सत्ता लाडकी असल्याची टीका त्यांनी केली. डॉ तांबे म्हणाले, वंचित आदिवासी व बहुजन समाजाला राज्यघटनेमुळे मताचा अधिकार मिळाला आहे. ही राज्यघटना आणि स्वातंत्र्य महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. गांधींचा मानवतावादी विचार जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा, असे आवाहन केले.

लकी जाधव म्हणाले, आदिवासींच्या विकासाच्या योजनेचा निधी हा लाडक्या बहिणीसाठी वापरला जात आहे हे सरकार आपले सर्व अधिकार काढून घेत असून सर्वांनी येत्या काळात महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन केले. डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या, आदिवासी हे मूळ देशाचे मालक आहे. स्त्रियांना मान देणारा पर्यावरणाचा रक्षण करणारा जीवनात जगण्यासाठी रोज संघर्ष करणारा आदिवासी बांधव असून हे सर्व प्रामाणिक व कष्टकरी असतात शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाह आणण्यासाठी आ.थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले जात आहे.

यावेळी संपतराव कडू, श्री.नवले, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, दशरथ गायकवाड, श्रीराम कुर्‍हे, मधुकर गोंदे, श्रीपत कुदळ, लहानु काळे, दत्तू तारडे, रामा मडके, राजू कवटे, डॉ.संतोष खेडलेकर, दिलीप बांबळे, अण्णा रहिंज, बाळकृष्ण गांडाळ, संदीप गोपाळे आदींसह परिसरातील कार्यकर्ते व आदिवासी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविक मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी तर सूत्रसंचालन अविनाश दिघे व नामदेव कहांडळ यांनी केले. प्रा. बाबा खरात यांनी आभार मानले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या