Thursday, January 29, 2026
Homeनगर180 जागांसह महाविकास आघाडीची सत्ता

180 जागांसह महाविकास आघाडीची सत्ता

आ.थोरात यांचा दावा || महायुतीबद्दल जनतेच्या मनात राग

संगमनेर |प्रतिनिधी|Sangamner

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी राज्यभर प्रचार दौरा केला. राज्यात सर्वत्र महायुती सरकारबद्दल प्रचंड राग असून निवडणुकीत महाराष्ट्रात 180 जागांसह महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त करताना असंवैधानिक व भ्रष्टाचारी महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणे हे पहिले उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

- Advertisement -

संगमनेरमधील सुदर्शन निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समवेत युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात उपस्थित होत्या. पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले, राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. शेतीमालाला भाव नाही. दुधाला भाव नाही. इंधन दरवाढ, ठप्प झालेला विकास यामुळे जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी 180 जागांसह विजयी होईल. मी राज्यभर प्रचार करत असताना संगमनेर तालुक्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळली. संगमनेरमधून नक्कीच मोठा विजय होणार असून जिल्ह्यात सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. शेजारी राहाता तालुक्यामध्ये प्रचंड दहशत आणि दडपशाही आहे.

YouTube video player

35 वर्ष एका घरात सत्ता, खासदार, मंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी विविध पदे असताना सुद्धा त्यांना तालुक्याचा विकास करता आला नाही. नगर-मनमाड रस्त्याची दुरवस्था असून यामुळे हजारो नागरिकांचे प्राण गेले आहेत.
साई संस्थानमधील 598 कर्मचार्‍यांचा प्रश्न प्रलंबित आहे. शहराचा आराखडा विकसित झालेला नाही. साई संस्थानचे सुसज्ज हॉस्पिटल असताना खासगी 200 बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची गरज काय? असे विचारताना साई संस्थान मोठे शैक्षणिक संकुल उभे करू शकले असते. मात्र ते होऊ दिले जात नाही. संस्थानच्या कारभारामध्ये बेकायदेशीरपणे हस्तक्षेप केला जातो.

मूळ भाजप कार्यकर्त्यांची दुरवस्था केली आहे. शिर्डीच्या अनेक जमिनींवर आरक्षण टाकून जनतेला वेठीस धरले आहे.
शिर्डीमध्ये अवैध धंदे, गुन्हेगारी वाढली आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर सर्वांनी आपला स्वाभिमान जिवंत ठेवून प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. संगमनेरमध्ये ज्याप्रमाणे शांतता-सुव्यवस्था आणि विकास आहे. तसे काम राहाता तालुक्यात करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राहाता तालुक्यातील प्रश्नांसाठी वेळेला रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी मी तयार आहे. ही राहता तालुक्यातील जनतेच्या स्वातंत्र्याची लढाई असून सर्वांनी सहभागी होऊन घोगरे यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रशासन दबावाखाली..
यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला. धरणामध्ये चांगला पाऊस आहे असे असताना सुद्धा तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी दिले जात नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन टाळत आहे. राजकारणासाठी जनतेशी कोणी खेळू नये. प्रशासन कुणाच्या दबावाखाली आहे, हे जनतेला समजले पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रशासनाने असे एकतर्फी वागणे अत्यंत चुकीचे आहे. प्रशासनाने नेहमी जनतेच्या हितासाठी काम केले पाहिजे, असे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : अजित पवारांच्या अंत्यसंस्कारापूर्वी शरद पवारांनी हात जोडले,...

0
बारामती | Baramati राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी काल (बुधवारी) बारामतीमध्ये एका भीषण विमान...