Saturday, May 25, 2024
Homeनगरआ. डॉ. किरण लहामटे यांचा पुन्हा ‘यु टर्न’

आ. डॉ. किरण लहामटे यांचा पुन्हा ‘यु टर्न’

अकोले |प्रतिनिधी| Akole

आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अधिकृत पाठिंबा दर्शविला असल्याचे आ. डॉ. किरण लहामटे यांनी आज बुधवारी अकोले येथे सांगितले. शरद पवार हे आपले दैवत आहेत मात्र तालुक्यातील विकासाच्या मुद्द्यावर आपण अजित पवार यांना पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

आ. डॉ. किरण लहामटे यांनी प्रथम अजित पवार यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यांच्या शपथविधीलाही ते उपस्थित होते. मात्र अकोलेत आल्यानंतर कार्यकर्ते व लोकांची मते जाणून घेतली.व ’यु टर्न’ घेत शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केला. अकोल्याच्या जनतेचा कौल मान्य करीत आपण शरद पवार यांचेसोबत शेवटपर्यंत त्यांची सोबत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्यांनी पुन्हा ‘ यु टर्न’ घेतला. त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्ते व लोकांत त्यांच्या वारंवार बदलणार्‍या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मुंबईत जाऊन त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.तालुक्यातील विकास कामांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यानंतर पुन्हा तालुक्यातील लोकांशी चर्चा करूनच आपण अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी घोषित केले होते.

बुधवारी त्यांनी अकोले बसस्थानक व अगस्ति कारखाना रोडची प्रमुख पदाधिकारी व अधिकारी यांचे समवेत पाहणी केली. तालुक्यातील रस्ते व विकासाची कामे होणार असेल तर अजित पवार यांच्या बरोबर जा, काहीजण शरद पवार यांच्यासोबत राहिले पाहिजे, परंतु शेवटी सर्वांनीच तुमची फसवणूक होणार नाही, एवढा सर्व निधी मिळणार असेल तर तुम्ही अजित पवार यांच्या सोबत गेले पाहिजे, अशी भूमिका घेतल्याने शेवटी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर, अगस्ति पतसंस्था अध्यक्ष अशोकराव देशमुख, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, नगरसेवक नवनाथ शेटे, आरिफ शेख, अक्षय आभाळे, उबेद शेख, वैभव वाडगे, मनसेचे तालुकाप्रमुख दत्ता नवले, बीआरएसचे संदिप शेणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेंद्र वाकचौरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या