Thursday, April 3, 2025
Homeनगरआ. जगताप यांच्या इशार्‍यानंतर बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाई

आ. जगताप यांच्या इशार्‍यानंतर बाजारपेठेतील अतिक्रमणांवर कारवाई

कारवाईसाठी मनपाकडून विशेष पथकाची नियुक्ती

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्टॉल लावण्यावरून अतिक्रमणधारक व दुकानदारांमध्ये झालेल्या वादानंतर आमदार संग्राम जगताप यांनी बाजारपेठेत व्यापार्‍यांशी संवाद साधला. पोलीस प्रशासन व आ. जगताप यांच्या सूचनेनुसार बाजारपेठ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने बुधवारी सकाळपासून कारवाई सुरू केली आहे. बाजारपेठेत अतिक्रमणे थाटली जाऊ नयेत, यासाठी महानगरपालिकेचे स्वतंत्र विशेष पथक बाजारपेठेत नियुक्त केले आहे.

- Advertisement -

मंगळवारी आ. जगताप यांनी व्यापार्‍यांशी संवाद साधल्यावर अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवण्याची मागणी करण्यात आली. पोलीस प्रशासनानेही महानगरपालिकेला सूचना दिल्या होत्या. त्यामुळे मनपा आयुक्तांनी स्वतः बाजारपेठेत जाऊन अधिकारी, कर्मचार्‍यांना कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले. महानगरपालिकेचे पथक पाहताच अतिक्रमण धारकांनी पळ काढला. बाजारपेठेतील रस्ते रिकामे करण्यात आल्यानंतर दुकानदारांनी महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी तंबी देऊन दुकानाबाहेर साहित्य न ठेवण्याच्या सूचना दिल्या. रस्त्यावर अतिक्रमण केल्यास हातगाडी विक्रेते असो वा फेरीवाले किंवा दुकानदार असो त्यांचे साहित्य तत्काळ जप्त करण्यात येईल. दंड भरूनही हे साहित्य पुन्हा दिले जाणार नाही, असे मनपाने स्पष्ट केले. तसेच यापुढे बाजारपेठेत लक्ष ठेवण्यासाठी व अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर अतिक्रमणे करू नये, असेही आयुक्तांनी बजावले आहे.

दरम्यान, आनंद धाम ते एलआयसी रस्त्यापर्यंत रस्त्यावर लावल्या जाणार्‍या ज्यूस सेंटरच्या गाड्या, रसवंतीच्या हातगाड्या महानगरपालिकेकडून हटवण्यात आल्या. ज्यूस सेंटरच्या दोन टपर्‍या जप्त करण्यात आल्या आहेत. अतिक्रमण विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, सुरेश इथापे यांच्या सूचनेनुसार माळीवाडा व बुरूडगाव रस्ता प्रभाग समिती कार्यालयाकडून संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे, अमोल कोतकर, अनिल आढाव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : डुप्लिकेट चावीने कुलूप उघडून चार लाखांचा ऐवज लांबविला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून आत प्रवेश करत 11 तोळे आठ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, कानातील डायमंड व आठ हजारांची रोकड असा तीन...