मुंबई | Mumbai
विधानभवन परिसरात गुरुवारी (१७ जुलै) दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद रात्रभर उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री १२ वाजता विधानभवनातून ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच जितेंद्र आव्हाड तात्काळ विधानभवन परिसरात पोहोचले आणि त्यांनी पोलिसांच्या कारसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला. एवढेच नव्हे तर हे आंदोलन पेटल्यावर जितेंद्र आव्हाड थेट पोलिसांच्या गाडीखाली झोपले. यानंतर पोलिसांनी ताकदीचा वापर करत आव्हाडांना गाडी खालून ओढून बाहेर काढले. त्यांना बाजुला करत नितीन देशमुखांना पोलीस घेऊन गेले.
जितेंद्र आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी दीड वाजता आंदोलकांची धरपकड केली. जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली होती. त्यामुळे पोलिसांनी आव्हाडांना गाडीसमोरून खेचत बाहेर काढले.
या सगळ्या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख याला विधानभवनात मारहाण केली. यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले. शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडले आहे. आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे. म्हणजे मार खाणार आमचा कार्यकर्ता, पळून जाणार पडळकरचे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
तसेच सत्ताधाऱ्यांना इतक शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिल नव्हतं..! या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची काही गोष्टच नाही..! मी इतकच सांगतो, माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी उठणार नाही, अशी पोस्ट आव्हाड यांनी एक्सवर केली आहे. तसेच पोलिसांच्या वाहनासमोर बसत आंदोलन करत असल्याचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे.
पुढे ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांनी शब्द दिला होता की नितीनला सोडणार. मात्र, त्यांनी शब्द फिरवला, आम्हाला फसवले.” दरम्यान, रात्री १ वाजता या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवारही विधीमंडळ परिसरात दाखल झाले होते.
रोहित पवारांचा संताप
आमदार रोहित पवार म्हणाले, “आम्ही नितीन देशमुखला पाठिंबा देतो. विधिमंडळात आव्हाड यांच्यावर हल्ला करायला मकोकाची ४ माणसे तुम्ही घेऊन येता. मात्र, विधीमंडळात विधानसभा अध्यक्ष हे खरे बॉस आहेत. दिलेला शब्द जर ते पाळत नसतील तर ही लोकशाहीची चेष्टा आहे. या गुन्हेगारांचा माज उतरवावा लागेल. नाहीतर हे इतके पुढे जातील. राज्यात महिला सुरक्षित राहणार नाहीत.”
रात्री नेमके काय घडले?
विधानभवन परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद रात्रभर उमटले. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलीस रात्री १२ वाजता विधानभवनातून ताब्यात घेतले. मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तत्काळ विधानभवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकत्यांसह ठिय्या दिला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील पोहोचले. जितेंद्र आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी दीड वाजता आंदोलकांची धरपकड केली, जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली. पण पोलिसांनी आव्हाडांना गाडी समोरून बाजुला खेचत बाहेर काढले आणि नितीन देशमुख यांना घेऊन गेले.
या घटनेनंतर आम्दार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते हे मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गेले. मात्र, पोलिसांनी नितीन देशमुखला तिथे नेले नव्हते. पोलिसांनी आव्हाडांना सांगितले की नितीन देशमुख यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड व रोहित पवार हे आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल झाले. तिथेही नितीन देशमुख नसल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




