Saturday, May 4, 2024
Homeनगरपाच नंबर तलावाचे काम करण्यास गायत्री सकारात्मक

पाच नंबर तलावाचे काम करण्यास गायत्री सकारात्मक

आमदार आशुतोष काळे : कोपरगाव नगरपालिकेने गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अटींची पूर्तता करावी

कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव शहरातील नागरिकांना मागील काही वर्षांपासून पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असून त्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे. साठवण तलावाचे काम करण्यासाठी समृद्धी महामार्गाचे काम करणार्‍या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीने सहमती दाखविली असून या कंपनीला येणार्‍या अडचणी दूर करून या कंपनीच्या अटींची कोपरगाव नगरपरिषदेने पूर्तता करून साठवण तलावाचे काम सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेत पार पडलेल्या बैठकीत प्रशासनाला दिल्या.

- Advertisement -

कोपरगाव शहराच्या प्रस्तावित पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करण्यासंदर्भात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की, कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पाच नंबर साठवण तलावाचे काम करण्यासाठी यापूर्वी समृद्धी महामार्गाचे काम करणारी गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनी तयार होती.

जिल्हाधिकार्‍यांच्या सोबत झालेल्या बैठकीतही या कंपनीने पाच नंबर साठवण तलावाचे काम करण्यास सहमती दर्शविली होती. परंतु या कंपनीने जास्त अंतराचे कारण दाखवून अद्यापही काम सुरु केले नाही. याबाबत खा. शरद पवार यांना माहिती दिली. त्यावेळी त्यांनी गायत्री कन्स्ट्रक्शनचे उपाध्यक्ष रेड्डी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून योग्य तोडगा निघाला आहे. गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनी पाच नंबर साठवण तलावाचे काम करण्यास तयार असून या कंपनीला येत असलेल्या अडचणी कोपरगाव नगरपरिषदेने सोडवून त्यांच्या अटींची तातडीने पूर्तता करावी. जेणेकरून पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु होण्यास मदत होईल.

त्याचबरोबर नदी संवर्धन योजनेअंतर्गत कोपरगाव शहरातून वाहणार्‍या गोदावरी नदीकाठच्या परिसर सुशोभीकरणासाठी व कोपरगाव शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे प्रस्ताव तयार करावेत. या रस्त्यांसाठी निधी आणण्याचे आश्वासन आ. आशुतोष काळे यांनी या बैठकीत दिले. कोपरगाव शहरात अपूर्णावस्थेत असलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन ही कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात अशा सूचना दिल्या.

यावेळी निळवंडे कोपरगाव पाईपलाईनबद्दल सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, संजय सातभाई, मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, हिरामण गंगुले, सुनील शिलेदार, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, दिनार कुदळे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी गोर्डे, अभियंता दिगंबर वाघ, ज्ञानेश्वर चाकणे, पाणीपुरवठा अभियंता ऋतुजा पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या