Saturday, May 4, 2024
Homeनगरशेती माल विकण्यासाठी ग्रेडिंग-क्लिनिंग-प्रोसेसिंग युनिट उत्तम पर्याय - आ. काळे

शेती माल विकण्यासाठी ग्रेडिंग-क्लिनिंग-प्रोसेसिंग युनिट उत्तम पर्याय – आ. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

केंद्र शासनाने शेतकरी मूल्य आश्वासन करार आणि कृषीसेवा करार विधेयक आणि कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयकाला मंजुरी दिली आहे.

- Advertisement -

या विधेयकामुळे शेतकर्‍यांना आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर जाऊन आंतरराज्य आणि आंतरजिल्हा विक्री करण्याची मुभा मिळाली असली तरी यामध्ये धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचे पैसे मिळतीलच याची शाश्वती नाही. नवीन कृषी विधेयकामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या या विधेयकाच्या आधारे शेतकर्‍यांच्या मेहनतीवर डल्ला मारू शकतात. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना आपला माल विकण्यासाठी धान्य ग्रेडिंग क्लिनिंग व प्रोसेसिंग युनिट उत्तम पर्याय असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

एच.डी.एफ.सी. बँकेच्या सहाय्याने परिवर्तन सामुदायिक विकास प्रकल्प कार्यक्रम अंतर्गत कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथे जीवनरेखा कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी या शेतकरी महिला संचलित शेतकरी उत्पादक कंपनीच्या धान्य ग्रेडिंग, क्लिनिंग आणि प्रोसेसिंग युनिटचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्याहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी मनिषाताई गवळी होत्या. ते म्हणाले की, प्रत्येक शेतकर्‍यांनी आपला शेतमाल विक्री करताना अधिकृत परवानाधारक व्यापार्‍यांनाच विकला पाहिजे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही, असे आवाहन केले. चालू वर्षी अनेक शेतकर्‍यांना खराब सोयाबीन बियाणे मिळाल्यामुळे त्यांचे नुकसान झाले होते. हे युनिट सुरू झाल्यामुळे शेतकर्‍यांना चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध होणार आहे.

ग्रामीण भागातील महिलांनी कृषी क्षेत्रात या निमित्ताने टाकलेले पाऊल स्वागतार्ह असून त्याबद्दल सर्व महिला भगिनींचे त्यांनी कौतुक केले. शेती मालाची प्रतवारी करून शेती मालाला योग्य भाव मिळणे करिता धान्य साफ सफाई युनिटची स्थापना करण्यात आली. सोबतच कंपनीद्वारे सोयाबीन खरेदी सुरू करण्यात आली आहे.

याप्रसंगी सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, मंडल कृषी अधिकारी माधुरी गावडे, कृषी सहाय्यक वसंत पावरा, परिवर्तन संस्थेचे व्यवस्थापक रमेश बादाडे, जीवन रेखा कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीच्या सर्व महिला संचालिका, तसेच संतू गवळी, चिमणराव गवळी व रामराव गवळी मढी व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या