Friday, November 22, 2024
Homeनगरविद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आमदार काळेंनी दिला हेल्पलाईन नंबर

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आमदार काळेंनी दिला हेल्पलाईन नंबर

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

बदलापूर येथील शाळेत चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आ. आशुतोष काळे यांनी आपल्या संपर्क कार्यालयाचा (9858550333) हेल्पलाईन नंबर दिला आहे. त्या हेल्पलाईन नंबरवर विद्यार्थिनींना तात्काळ मदत उपलब्ध होणार असून त्यामुळे विद्यार्थिनींच्या पालकांची मोठी चिंता मिटणार आहे.
बदलापूर शाळेतील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आ. काळे यांनी सोमवारी सर्व शैक्षणिक संस्था चालक तसेच जिल्हा परिषद शाळा व रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची कोपरगाव येथे बैठक घेतली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करून हेल्पलाईन नंबर बाबत सविस्तर माहिती दिली.

- Advertisement -

आ. आशुतोष काळे म्हणाले, बदलापूर येथील घटना अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालय प्रशासनाने यापुढे अधिक जागरूकपणे सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. शासनाकडून आलेल्या नवीन नियमावली अंमलात आणून अशा घटना टाळण्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी. पोलिसांनी नियमितपणे शाळा, महाविद्यालय, बसस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी सिव्हील ड्रेसवर गस्त वाढवावी. याठिकाणी अनेक रोडरोमिओ विद्यार्थिनींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्रास देतात. त्याबाबत शिक्षण बंद होईल या भीतीपोटी विद्यार्थिनी पालकांकडे वाच्यता करीत नाहीत.

पालक देखील तक्रार करीत नाहीत. त्यामुळे रोड रोमिओंची हिम्मत वाढत चालली असून त्या रोडरोमिओंचा कायमचा बंदोबस्त करा. शाळा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या विद्यार्थिनींना शाळा महाविद्यालय सुटल्यानंतर वेळेत घरी पोहोचण्यासाठी वेळेवर कोपरगाव आगार प्रमुखांनी बस उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करावे. यावेळी शहर पोलीस निरीक्षक भगवान माथुरे, ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र महाजन, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, महिला व बालकल्याण अधिकारी पंडित वाघिरे, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख आदींसह कार्यकर्ते, मतदार संघातील शाळा-महाविद्यालयांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक व प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थिनींना प्रत्येक संकटाचा सामना करता यावा व निर्भयपणे समाजात ताठ मानेने जगता यावे संकटकाळी स्वत:चे संरक्षण देखील करता यावे, त्यासाठी काय केले पाहिजे याचे धडे देण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाने पुढाकार घेतला आहे. मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जाणार आहे. ज्या शाळा महाविद्यालयांना आपल्या विद्यार्थिनींसाठी ही कार्यशाळा आयोजित करावयाची आहे त्यांनी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाशी संपर्क करावा. 
- आ. आशुतोष काळे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या