श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
सर्व प्रमुख उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये वैध ठरल्यानंतर पत्रकारांनी महायुतीमधील दोन पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल काय? असे विचारले असता आमदार लहू कानडे यांनी,वरिष्ठ नेते प्रगल्भ असून ते योग्य निर्णय घेतील, त्यामुळे कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही तर महायुती व महाविकास आघाडीमध्ये थेट सामना होईल, असे प्रतिपादन केले.
श्रीरामपूर विधानसभा मतदार संघामध्ये आ. कानडे यांना काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना उमेदवारीही दिली. सदरचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी सर्वांशी विचारविनिमय करूनच घेतलेला आहे. महायुतीचे नेते समजूतदार व प्रगल्भ आहेत. तसेच उमेदवार निवडून येणे महत्त्वाचे असल्याने महायुतीचे जिल्ह्याचे नेते देखील समजूतदार भूमिका घेतील. कारण त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. त्यामुळे नेवासा असो की श्रीरामपूर व संगमनेर येथे कुठेही महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार नाहीत, असे पत्रकारांशी बोलताना आ. कानडे म्हणाले.
आ. कानडे यांच्या संघटनेने 100 टक्के बुथ कमिट्या स्थापन केलेल्या आहेत. त्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही गावनिहाय बुथ कमिट्यांची भर पडली आहे. शहरातील माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांचे सहकारी नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते ही मोठी जमेची बाजू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, आ. कानडे व अरुण पाटील नाईक एकत्रितपणे गाठीभेटी करताना दिसत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत आ. कानडे यांचे सर्व पदाधिकारी यशोधन कार्यालयामध्ये प्रचाराचे नियोजन करण्यासाठी उपस्थित होते.
आदिकांचे नेटवर्क अन् कार्यकर्त्यांचा उत्साह
तळागाळापर्यंत आ. कानडे यांचे आणि अविनाश आदिक यांच्या नेतृत्वाखाली नेटवर्क असल्याने व अजूनही मतदारसंघातील ज्येष्ठ नेत्यांचा आ. कानडे यांच्या उमेदवारीला आशीर्वाद मिळण्याची शक्यता असल्याने सर्वांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.