Tuesday, September 17, 2024
Homeनगरग्रामविकासमंत्र्यांच्या भेटीचा राजकीय संबंध नाही - आ. कानडे

ग्रामविकासमंत्र्यांच्या भेटीचा राजकीय संबंध नाही – आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

मतदारसंघातील प्रश्नांसाठी सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांना भेटणे व जनतेसाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा करणे हे मी माझे कर्तव्य मानतो. योगायोगाने संधी आल्याने मी ग्रामविकास मंत्र्यांना भेटलो. त्याचा कोणत्याही राजकीय गोष्टीशी काहीही संबंध नाही. काँग्रेस पक्षाचा मी निष्ठावंत सैनिक आहे. काँग्रेसने मला सन्मान तसेच स्वाभिमान दिला, म्हणून अखेरच्या क्षणापर्यंत मी काँग्रेसजण म्हणूनच जगणार असल्याचे आमदार लहू कानडे यांनी स्पष्ट केले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसंदर्भात आ. कानडे यांनी सांगितले की, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाला सन 2024-25 मधील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व पीएमजेएसवाय योजनेचा निधी देण्यात आलेला नाही.

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने श्रीरामपूर मतदारसंघाला अद्याप निधी दिला नाही. उलटपक्षी विरोधी पक्षाचे आमदार वगळून इतरांना 50 कोटी ते 80 कोटी पर्यंतचा निधी देण्यात आलेला आहे. सदरच्या योजना ग्रामविकास विभागामार्फत राबविल्या जातात. त्या अनुषंगाने मतदार संघातील रस्त्यांसाठी भेदभाव न करता निधी देण्यात यावा, म्हणून यापूर्वीच राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांना पत्र देण्यात आलेले आहे. रस्त्याने जात असताना काही कार्यकर्ते भेटले आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी थांबलो. तेथे ग्रामविकास मंत्री आल्याचे समजल्याने त्यांना भेटून निधी देण्याबाबत विनंती केलेल्या पत्राचे स्मरण द्यावे म्हणून भेटलो. मतदार संघातील प्रश्नांसाठी सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांना भेटणे व जनतेसाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा करणे हे मी माझे कर्तव्य मानतो. योगायोगाने संधी आल्याने मी भेटलो. त्याचा कोणत्याही राजकीय गोष्टीशी काहीही संबंध नाही.

मी प्रागतिक चळवळीतील लेखक असून छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेचा पुरस्कर्ता आहे. 40 वर्षांपासून लिहीत असलेले माझे लेखन त्याची साक्ष आहे. त्यामुळे भाजपा किंवा तत्सम संकुचित विचारधारेवर मी सदैव टीका केलेली आहे. भारतीय संविधान आणि काँग्रेस पक्षाचा मी निष्ठावंत सैनिक आहे. काँग्रेसनेच मला सन्मान दिला. स्वाभिमान दिला. म्हणून अखेरच्या क्षणापर्यंत मी काँग्रेसजण म्हणूनच जगणार असल्याचे आ.कानडे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या