Thursday, June 13, 2024
Homeनगरआमदार कानडे यांनी आमसभेत केली अधिकार्‍यांची कानउघाडणी

आमदार कानडे यांनी आमसभेत केली अधिकार्‍यांची कानउघाडणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

राज्यासह तालुक्यामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना पाटबंधारे व वीज वितरण विभागाचे अधिकारी शेतकर्‍यांना सहकार्य करण्याऐवजी अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. पाटपाणी व विजेच्या प्रश्नावरील जनतेच्या रोषाची अधिकार्‍यांनी दखल अधिकार्‍यांनी घ्यावी, पाटबंधारे खात्याचा एक कर्मचारी लाच घेताना पकडला गेला, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्याऐवजी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या नावाखाली तीन-चार महिने जनतेची पिळवणूक केली गेली. या सर्व गोष्टी प्रशासनासाठी चांगल्या नाहीत. यामध्ये तातडीने सुधारणा करण्यात यावी, अन्यथा मला लिहावे लागेल कारण मी लेखक सुद्धा आहे हे अधिकार्‍यांनी विसरता कामा नये, असा सज्जड दम तालुक्याचे आमदार लहु कानडे यांनी दिला.

येथील प्रशासकीय इमारतीत आ. कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित आमसभेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, गटविकास अधिकारी प्रविण सिनारे, मुख्याधिकारी गणेश शिंदे, माजी जि. प. सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे, प्रवीण काळे, संजय गांगड, सुरेश पवार, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. काळे, राजेंद्र औताडे, आबा पवार, विष्णूपंत खंडागळे, अशोक भोसले आदी उपस्थित होते.

पाटबंधारे विभागाचे उप अभियंता संजय कल्हापुरे यांनी यावेळी सर्वांना पाणी देण्याचा प्रयत्न आहे. सध्या 16 चार्‍या चालू आहेत, बेलापूर, एनबी व डीवायवन या चार्‍या सोडण्यात येणार आहेत. सात नंबर अर्जासोबत सातबारा उतारे घेण्यात येत नाहीत. मागणीप्रमाणे पाणी देत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर आ. कानडे यांनी, आपला एक कर्मचारी लाच घेताना पकडला त्यानंतर संबंधित चारी लगेचच बंद करण्यात आली. त्याठिकाणी कर्मचारी नियुक्त केला नाही. हा काय प्रकार आहे. या घटनेने तालुक्याची चव घातली आहे. असे सांगत तेथे माणूस नेमून तातडीने चारी सोडण्याची सूचना केली. त्यानंतर दुपारपर्यंत माणूस नेमण्यात येईल, असे कल्हापुरे म्हणाले.

महावितरणचे सहायक अभियंता प्रभाकर माळी यांनी, 15 फिडरचे बाय फार्गेषणचे प्रस्ताव दिले असल्याचे सांगितले असता किती रोहित्रे ओव्हरलोड आहेत ते सांगा, असे आ. कानडे म्हणाले असता ती माहिती नसल्याचे माळी यांनी सांगितले. रोहित्रांवर आकडे टाकल्याने ते ओव्हरलोड होत असल्याचे स्पष्ट करत त्याची चौकशी कोणी करायची, त्यासाठी अधिकारी, कर्मचारी नेमून चौकशी करावी, ज्यांच्या कार्यक्षेत्रात ओव्हरलोड होतात, त्यांना निलंबित करा, अशा सूचना केल्या.

आ. निधीतून आपण 50 लाख रुपये मंजूर केले. त्यात 14 रोहित्रे होणार होती. मात्र महावितरणने इन्सेंटिव्ह वाढवून केवळ 6 रोहित्र होणार असल्याचे सांगितले. अशी कुरघोडी करत असाल तर अवघड आहे. गोंधवणीच्या ग्राहकांना वीज कनेक्शन न देता त्यांना वीज बिले देत असल्याचा प्रकार भयंकर असल्याचे सांगून लोक संतापले आहेत. त्यांचा उद्रेक झाल्यास मला दोष देऊ नका, असे आ. कानडे म्हणाले. घरकुलांचे प्रस्ताव तयार आहेत. अतिवृष्टीच्या अनुदानाच्या याद्या अपलोड झाल्या आहेत, ही प्रक्रीया ऑनलाईन असल्याने येणार्‍या अडचणीतून मार्ग काढू, असे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी सांगितले.

यावेळी मुरली राऊत, बाळासाहेब तनपुरे, माजी सभापती पी. आर. शिंदे, दिलीप बकरे, सचिन मुरकुटे, सरपंच संदीप शेलार, भागचंद नवगिरे, अरुण कवडे, सुधाकर खंडागळे, भारत तुपे, विलास शेजूळ, अनिल ढोकचौळे, बापू सदाफळ, छावाचे नितीन पटारे, शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले, निलेश शेडगे, दत्तात्रय औताडे, दिलीप त्रिभुवन, रणजित जामकर, राजेंद्र ओहळ, संतोष मोकळ, नारायण काळे यांनी पाटपाणी, वीज, घरकुल, अतिवृष्टी अनुदान, पिक विमा, पाट चार्‍यांची दुरुस्ती, ओव्हरलोड रोहित्रे, गावतळे भरणे, रेशनकार्ड, जातीचे दाखले, जातीनिहाय जनगणना, जल जीवन पाणी योजना, गावठाण अशा विविध प्रश्नांवर सूचना केल्या.

5 सप्टेंबरपासून आपण मतदार संघात संवाद यात्रेनिमित्त दौरा करणार असून यावेळी जनतेचे प्रश्न जाणून घेणार आहे. त्यावेळी अधिकारी सोबत असतील, दररोज सकाळी दोन व सायंकाळी दोन असा चार गावांतून दौरा होईल. त्यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन आमदार कानडे यांनी केले.

मागील सरकारच्या काळात कृषी विभागाकडून यांत्रिकीकरण ट्रॅक्टरसह सर्व औजारे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच शेतीपुरक लागणार्‍या गरजेच्या वस्तुंसाठी लकी ड्रॉद्वारे दर पंधरा दिवसाला सोडत काढून महिनाभरात त्याचा लाभ शेतकर्‍यांच्या खात्यात मिळत होता. मात्र, या मार्च महिन्यापासून काही शेततळे व कांदाचाळी, स्प्रिंकलरच्या दोन ड्रॉ वगळता सोडती बंद असल्याने शेतकर्‍यांना मिळणारा लाभ बंद झाला आहे, याची दखल घेण्याची मागणी माळेवाडीचे सरपंच सोपान औताडे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या