पारनेर (तालुका प्रतिनिधी) – फोडाफोडीच्या राजकारणात आम्हाला कोणत्याही प्रकारचा रस नसून शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाच्या हुकुमशाहीला कंटाळून पाच नगरसेवकांसह महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी पक्षबदलाचा निर्णय घेतला आहे. हे नगरसेवक शिवसेना सोडण्याच्या निर्णयावर असताना ते भाजपच्या संपर्कात होते.
या सबंधीच्या भाजप नेत्यांशी तीन ते चार बैठका झाल्या होत्या. परंतु तुम्ही जर आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामावून घेत असाल तर भाजप प्रवेशाबाबत आम्ही फेरविचार करू शकतो, असे त्यांचे मत आल्यानेच पाच नगरसेवकांसह इतर शिवसेना पदाधिकार्यांना महाआघाडीचा घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या इच्छेनुसार प्रवेश दिला असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचे सरकार असून प्रवेश केलेले नगरसेवक या सरकारच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे आ. निलेश लंके यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रवेशाबाबत कोणीही गैरसमज पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे आगामी नगरपंचायत ही विरोधकांकडे जाऊ नये यासाठी या नगरसेवकांना प्रवेश दिला असल्याची भूमिका आ. लंके यांनी स्पष्ट केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर शहरासह वाड्यावस्त्यांवरील पाणीप्रश्न प्रलंबित असून तो या महाआघाडी सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र स्थानिक हुकुमशाही शिवसेनेच्या नेतृत्वाला कंटाळून पक्षबदलाचा निर्णय घेतला असल्याचे नगरसेवकांनी आर्वजून सांगितले आहे.
सध्या राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीचे सरकार असून शिवसेनेच्या पाच नगरसेवकांसह इतर प्रमुख पदाधिकार्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशावरून वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे यावर आ. निलेश लंके यांच्यासह प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या नगरसेवकांच्या प्रवेशाने महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा ढवळले असून, शिवसेनेच्या नेतृत्वानेही याची गंभीर दखल घेतली असल्याची चर्चा आहे.