पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
आ. मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील मतदान केंद्रावर झाला. यावेळी आक्रमक जमावापासून बचाव व्हावा, म्हणून राजळे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतःला मतदान केंद्राच्या खोलीत कोंडून घेतले. उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेत दोन तास मतदान केंद्रात बसून असलेल्या राजळे यांची सुटका केली तर या घटनेने संतप्त झालेल्या हजारो राजळे समर्थकांनी रात्री शहरातील माणिकदौंडी चौकात रास्तारोको आंदोलन सुरू केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या घटनेत राजळे व त्यांचे चार समर्थक किरकोळ जखमी झाले असून याप्रकरणी राजळे यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने या संदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनला करण्यात आली नव्हती. या प्रकरणाने मात्र किरकोळ शाब्दिक चकमक वगळता शांततेत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेस गालबोट लागले. सायंकाळी राजळे या शिरसाठवाडी मतदान केंद्रावर वाद सुरू असल्याचे समजल्यावर त्या ठिकाणी गेल्या असता, तेथे शेकडो युवक जमा झाले व त्यांनी राजळे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी या तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस दल अपुरे असल्याने उपयोग झाला नाही.
यानंतर राजळे यांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. ती चालू असतानाच राजळे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राच्या खोलीत नेले. यावेळी मतदानप्रक्रिया संपलेली होती. जवळपास एक तास वीज गायब झाल्याने राजळे यांना काही काळ अंधारात बसावे लागले. दरम्यान या घटनेची माहिती कळताच काही राजळे समर्थक शिरसाठवाडीकडे निघाले होते. दरम्यान पाटील व पोलीस निरिक्षक संतोष मुटकुळे हे शिरसाठवाडी येथे मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन आले व त्यांनी मतदानकेंद्राजवळ जमा झालेल्या तरुणांना हुसकावून लावले. यावेळी पाटील यांच्याशी बोलताना राजळे म्हणाल्या, काही मतदान केंद्र हे संवेदनशील असल्याचे पत्र आधी दिले होते.
बुधवारी सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मला ठरवून विरोध करण्यात आला. शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर जाणीवपूर्वक माझी अडवणूक करण्यात आली. यानंतर राजळे यांनी शिरसाठवाडी ते पाथर्डी या नेहमीच्या मार्गाने न आणता पोलिसांनी दुसर्या रस्त्यावरून पाथर्डीला आणले. दरम्यान या घटनेची माहिती कळताच राजळे यांचे हजारो समर्थक माणिकदौंडी चौकात जमा झाले व त्यांनी दगडफेक करणार्या तरूणावर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी करत रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते.