माझे सासरे (आ.नरेंद्र दराडे) राजकारणात असल्याने त्यांना खूप लोक भेटायला येतात, त्यांना मधुमेह असल्यामुळे काळजी वाटते. पप्पा नियमित मास्क लावा, गाडी निर्जंतुक करा, सुरक्षित अंतर ठेवा, इकडे जाऊ नका-तिकडे जाऊ नका, हे आपल्या सगळ्यांच्याच घरच्या प्रमाणे आमच्या घरी देखील चालू होते.
१५ दिवसापूर्वी संपर्कात आलेली १ व्यक्ती करोना बाधित असल्यामुळे भीतीपोटी कोणतीही लक्षणे नसताना REAL TIME PCR REPORT एका लॅब मध्ये करून घेतले.
रिपोर्ट निगेटिव्ह येणेच अपेक्षित होते पण रविवारी सकाळी ७ वाजता अचानक फोन आला आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत, असे सांगण्यात आले.
मग सुरु झाली पळापळ. मुंबईत फोरटीस हॉस्पिटलमध्ये रूम घेतली. ५ तासात मुंबईला पोहचवण्यात आले. इतक्या अवघड परिस्थिती मध्ये काय चूक काय बरोबर हे सुचण्याच्या अगोदरच पप्पा हॉस्पिटल मध्ये दाखल होऊन एचआरसीटी आणि बाकी बऱ्याच टेस्ट झाल्या, सर्व रिपोर्ट नॉर्मल आले.
घरून निघताना सासऱ्यांच्या डोळ्यात कधी नव्हे ते पाणी आलं. स्वतःसाठी नाही तर घरातल्या लहान मुलांसाठी. मी एक सुजाण नागरिक म्हणून सरकारी यंत्रणेला कळवले की, आमच्या घरातील एका व्यक्तीचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे.
लगेचच ३-४ तासात शासकीय यंत्रणा हॉस्पिटलला येऊन घरातील १८ जणांचे स्वब घेतले गेले, हॉस्पिटल बंद केले. ठरलेली ऑपरेशन, डिलिवरी, सीझर, सगळचं रद्द केलं. वेळ दिलेल्या रुग्णांना झालेला प्रकार सांगितला व शहरातील इतर डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला.
एक एक क्षण एक एक तासासारखा वाटू लागला. रिपोर्ट यायला ४० तास लागणार होते, घरात मी डॉक्टर असल्यामुळे सर्वाना धीर देत होते. पण मनातून खूप भीती वाटत होती.पायाखालची जमीन सरकल्यासारखी फिलिंग येत होती.
सर्वांचे मोबाईल खणखणायला लागले मिडियावर बातमी आली. शिवसेना आमदार नरेंद्र दराडे करोना बाधित संपूर्ण महाराष्ट्रातून फोन यायला सुरवात झाली. कोणी रडत होते कोणी आमची झोप उडाली, असे सांगत होते.
या सर्व प्रकारामुळे घरचे सर्व लोक अजून घाबरून गेले . घरातल्या प्रौढ महिलांनी देवघर धरले, सर्वांनी देवाचा धावा सुरू केला व घरातही मास्क लावले. मंगळवारी दुपारी शेवटी सरकारी यंत्रणेकडून रिपोर्ट आले १६ पैकी ८ पॉझिटिव्ह, माझ्या कुटुंबात फक्त माझाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
सासूबाई, पती व मुलीचा रिपोर्ट निगेटिव्ह. माझा मुलगा अवघा ३ महिन्यांचा असल्यामुळे सर्व काळजीत पडले. मी एवढी काळजी घेतली तरी असं कसं झाल? असे विचार मनात सारखे येत होते. मुंबई व नाशिक मधील कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये घरातील सर्व पॉझिटिव्ह लोकांसाठी रूम बुक करण्यात आल्या.
मी स्वतःला वेगळ्या खोलीत आयसोलेट करून घेतले माझी ६ वर्षाची मुलगी सारखी खोलीत यायचा प्रयत्न करत होती. म्हणून कधी नव्हे ते तिला खूप ओरडले, बिचारी घाबरून मम्मा अशी का वागतेय विचार करून दूर निघून गेली.
सर्वांनाच रडू अनावर झालं. त्यातच काही स्वार्थी लोकांचे फोन येत होते आता आमच काय, त्यांना सांगितले बाबांनो मी पूर्णवेळ पीपीई किट,मास्क, फेस शिल्ड, डबल ग्लोव्हजमध्ये असल्यामुळे तुम्हाला धोका फार कमी आहे.
तरी ही तुम्ही होम कॉरंटाईन रहा व कम्पलसरी मास्क लावा, लक्षणे दिसली तर टेस्ट करून घ्या असं सांगितलं. थोडसं डोकं शांत झाल्यावर विचार आला की एकाच बेडरूममध्ये राहणाऱ्यांमध्ये एक पॉझिटिव्ह व एक निगेटिव्ह असे रिपोर्ट का? तेवढ्यात सासऱ्यांचा मुंबईहून फोन आला की ऍडमिट करताना माझा जो स्वब घेतला होता तो निगेटिव्ह आहे.
आणि मला डिस्चार्ज देत आहेत. मग आम्ही सर्वांनी पुन्हा टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. मनातून पूर्ण तयारी झाली होती की, आपण बाळासाठी घरी राहण्याची धोका पत्करू नये. अशोका हॉस्पिटलमध्ये रूम बुक केल्या, बाळासाठी लागणाऱ्या सर्व सामानाची यादी केली नियमित मास्क घातला बाळाला दूर झोपवलं.
वाटत होत ८ लोकांपैकी बरेच ६० वर्षावरील व बरेच १० वर्षाच्या आतील असल्यामुळे कुणाला तरी सौम्य लक्षणे दिसतील पण कोणालाही काही लक्षणे नाही दिसली अँटी बॉडी टेस्ट केल्या ते ही निगेटिव्ह.बुधवारी रात्री सर्व सामानाची पकिंग केली या तयारीत कि सकाळी हॉस्पिटलला ऍडमिट व्हायचे आहे.
मुलगी रडायला लागली, रात्री दीड वाजेपर्यंत मम्मा गेल्यावर मला झोप येणार नाही, मम्माची गळाभेट केल्याशिवाय मला झोप येत नाही, आता माझ्या मम्माच काय होईल? टी. व्ही. वर करोनाच्या बातम्या बघून आपल्या पेक्षा मुलं जास्ती घाबरलेली असतात, ती सर्व भीती तिच्या बोलण्यातून जाणवत होती.
सासूबाईंनी कसे तरी समजावून तिला झोपी लावले. बाळाला दूर ठेवूनच कशीतरी झोपली दूरूनच त्याला बघत होते. तोही आईच्या कुशीत नसल्यामुळे स्वस्त झोपत नव्हता.निवांत पडल्यावर लक्ष्यात आले की, आपल्याला खूप माऊथ अल्सर झाले आहेत.
इतके अल्सर मला फक्त एमबीबीएसच्या अंतिम परीक्षेला झाले होते. म्हणजे शरीरावर इतका ताण होता की जो ताण अल्सरच्या रुपात बाहेर पडत होता. शेवटी कशी तरी थोडीफार झोप लागली. सकाळी ७ वाजता जाग येताच व्हाट्स अप चेक केल तर सर्व रिपोर्ट निगेटिव्ह, डोळ्यावर विश्वास बसेना, लॅब ला फोन करून पडताळणी करून घेतली, रपीड किट परत टेस्ट केली तीही निगेटिव्ह, सर्वाना परत विचारणा केली कोणाला काही त्रास होतोय का?
तर कोणाला काहीच त्रास नाही.जीव भांड्यात पडला ज्या घरात २ आमदार व ४ डॉक्टर आहे त्या कुटुंबाची अशी अवस्था तर सामान्य लोकांचे काय?ह्या चार दिवसात जे मानसिक, आर्थिक, सामाजिक नुकसान झाल त्याला जबाबदार कोण. हे चार दिवस खूप काही दाखवून गेले आपले मित्र म्हणून ज्या डॉक्टरांकडे पेशंट पाठवले होते.
त्यापैकी काहींनी आम्ही दराडे मॅडमचा ठेका घेतला नाही,अस सांगून तपासण्यास नकार दिला.त्यावरून गोड बोलणारे आतून कसे आहेत हे समजले.आजूबाजूचे जे लोक मोठे लोक म्हणून चिटकायला येतात त्यांच खरे रूप समजले. रिपोर्ट निगेटिव्ह येताच मुलीने कडकडून मिठी मारली आणि मम्मा मी आता तरी तुझी पप्पी घेऊ का ?
म्हणाली हे ऐकूण ४ दिवसाचा सगळा ताण निघून गेला व आम्ही एकमेकीना कडकडून मिठी मारली.बाळाला ४ दिवसानंतर जवळ घेतले.अति काळजी पोटी लक्षणे नसतानाही मी सासऱ्यांची टेस्ट करून घेतली व त्यामुळे सर्व रामायण घडलं.
यासाठी मी सर्व दराडे कुटुंबियांची जाहीर माफी मागते व सर्वांनी करोना टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्या, पण लक्षणे नसताना कुठलीही चाचणी करू नये हेच यातून निष्पन होते.
या वाईट वेळेत ज्या सर्वांनी मानसिक आधार दिला त्यांचे मनापासून धन्यवाद.
करोनाचा हा अनुभव करोना कहर म्हणून नेहमी लक्षात राहील.
या सर्व प्रकारात चूक कोणाची मशीनची का यंत्रेणेची की आपली ते माहित नाही. पण सर्व प्रकाराची शहानिशा व्हावी ही अपेक्षा आहे.
शेवटी एकच गोष्ट सत्य आहे.घरी रहा सुरक्षित रहाजे मागच्या ४ दिवसात जे घडल ते सगळ्यांशी शेअर करायला पाहिजे.
डॉ.कविता कुणाल दराडे