Monday, May 20, 2024
Homeनगरतेव्हा तुम्ही आमची मजा पाहिली, आता आम्ही तुमची मजा पाहु

तेव्हा तुम्ही आमची मजा पाहिली, आता आम्ही तुमची मजा पाहु

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मी पाच वर्षे पालकमंत्री असताना कोणालाही त्रास दिला नाही. सतेत असताना एक आणि सत्तेत नसताना एक अशी बोटचेपी भुमिका कधी घेतली नाही. जिल्ह्याच्या बाहेरील शक्ती जिल्ह्यात आणुन मला पाडलं. पडलो की पाडलं? ते माहीत नाही. मात्र तेव्हा सर्वांनी मजा पाहिली. आता आम्ही मजा पाहु. वेळ प्रत्येकावर येते. असे विखे यांचे नाव न घेता सुचक इशारा देत पक्षाने संधी दिल्यास अहमदनगर दक्षिण मतदार संघातून आगामी लोकसभा निवडणुक लढण्याचे संकेत प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष व माजी मंत्री आ. प्रा. राम शिंदे यांनी दिले.

- Advertisement -

तालुक्यातील एका सहकारी पतसंस्थेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आ. शिंदे बेलापूरला आले असता ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. लहु कानडे होते.

आ. शिंदे म्हणाले की, सध्या खालचा आणि वरचा पाण्याचा संघर्ष सुरु आहे. मात्र मी जिल्ह्याचा पाच वर्षे पालकमंत्री असताना समन्यायी पाणी वाटप कायदा झालेला नाही, हे ठामपणे सांगू इच्छितो. तेव्हा काय घडलं आहे? हे सर्वांना माहीत आहे. आपण कधी त्रास देण्याची भुमिका घेतली नाही. मात्र बाहेरील शक्ती जिल्ह्यात आणुन मला पाडलं. पडलो की पाडलं? हे माहीत नाही. पण तेव्हा सर्वांनी आमची मजा पाहिली. आता आम्ही मजा पाहु. वेळ सर्वांवर येते.

यावेळी मा.आ.भानुदास मुरकुटे यांनी आमच्या कोणी नादी लागत नाही. असे म्हणताच आ.शिंदे म्हणाले की, आम्ही छोटी माणसं असल्याने स्वतःहुन कोणाच्या नादाला जात नाही. मात्र आमचा नाद केला तर नाद पुरविल्याशिवाय राहणार नाही. सत्य बोलणे हेच आपले भांडवल असुन आपण सत्तेत असताना एक आणि सत्तेत नसताना एक असे बोटचेपे धोरण कधीच घेतले नाही. सत्य बोलणे आणि वागणे हेच आपले भांडवल असुन प्रामाणिकपणे सेवा करणार्‍याचे नशीब कोणीच हिराऊन घेऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही मोठ्या पदांसाठी आपलं नाव पुढे असते. विधान परिषदेसाठी अनेक दिग्गज रांगेत असतानाही आपल्या निवडीने केलेले प्रामाणिक कार्य आणि विश्वास सिद्ध केला. भविष्यातही काय व्हायचे ते होईलच.

जिल्हाप्रश्नी श्रीरामपूरचे पुढारी गप्प का ?

जिल्हा विभाजनाच्या प्रश्नांवर त्यांच्याकडे चिठ्ठी आली असता त्यावर आपला जिल्हा राज्यात भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा असल्याने जिल्हा विभाजनावर आपण आजही ठाम आहोत. प्रशासकीय सोयी, सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजेत.जिल्हा विभाजन झाल्यातच जमा असुन विभाजन नावापुरतेच बाकी आहे, असे स्पष्ट करुन या प्रश्नावर श्रीरामपूरचे पुढारी गप्प का आहेत? असा सवालही त्यांनी केला. जेव्हा माझ्या हातात होत.तेव्हा तुम्ही मागितलं नाही.त्यामुळे विलंब झाला. भाजप नेते माजी आ. चंद्रशेखर कदम यांनी व्यासपीठावर उत्स्फूर्तपणे श्रीरामपूर जिल्हा, झालाच पाहिजे अशी घोषणा दिली. तेव्हा सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यावर तुमचा निरोप मी वरपर्यंत पोहोचवतो असे आ. शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या