मुंबई । Mumbai
राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी ५ डिसेंबरला होणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार असून मुख्यमंत्रिपद भाजपकडे असणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे. पण, महायुतीकडून अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे दररोज नवनवीन चर्चा समोर येत आहेत. त्यातच फडणवीसांचे निकटवर्तीय असेलेल आमदार रवींद्र चव्हाण यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, आता त्यावर स्वत: रवींद्र चव्हाण यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडियातील पोस्टमधून खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “गेल्या २-३ दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसात किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाहीये. त्यामुळे कृपया प्रसार माध्यमांनी कोणत्याही प्रकरणाची शहानिशा करून बातम्या चालवाव्यात, ही नम्र विनंती !”