जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याकांड घडून महिना होत आला तरी पण एक आरोपी अद्याप फरार असून वाल्मिक कराडप्रकरणी पोलीस प्रशासन निश्चितच कमी पडले आहे, असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले. विधानसभा निवडणुकीनंतर आ. रोहीत पवार यांनी जामखेड तालुक्यात गावभेट दौरा सुरू केला आहे. ते जामखेड तालुक्यातील सरदवाडी येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, वाल्मिक कराड हा नागपूर अधिवेशनावेळी तेथेच होता. पुणे येथे राहून तो पोलिसांना शरण आला. तसेच त्याच्या अटकेनंतर खाट आणल्याचे सांगितले जात आहे. हे योग्य नाही. राहिलेल्या तीन आरोपींना लवकरात लवकर पकडून देशमुख हत्याकांडातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी व देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, असेही ते म्हणाले. आ. रोहीत पवार म्हणाले, सुरेश धस हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले असतानाही त्यांना मंत्रीपद मिळाले नसल्याने एका अर्थाने अन्यायच झाला आहे. परळी मतदारसंघात फक्त बोटाला शाई लावून बाहेर निघून यावे लागत होते.
बोगस मतदानामुळे धनंजय मुंडे यांना मताधिक्य आहे यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, याबाबत देवेंद्र फडणवीस व सरकारने यांची चौकशी करावी व पुन्हा निवडणुका घ्याव्यात. सरकार स्थापन झाले आहे पण अनेक प्रश्न आहेत अनेक मंत्र्यांनी पदभार स्विकारलेला नाही. सरकारचा कसलाही जल्लोष नाही त्यांनाच आणखी खात्री नाही आपण कसे निवडून आलोत ते. सध्या सोयाबीन खरेदी, शिष्यवृत्ती, शिक्षण याबाबत अनेक अडचणी आहेत. सरकारला तर शेतकर्याचा सोयबीन घ्यायचाच नाही . कारण काय द्याचं तर बारदाना नाही. राज्यातील सर्व मंत्र्यांना विनंती करतो की, तुम्हाला पदे मिळाली आहेत त्याचा योग्य वापर करा व शेतकर्यांचा फायदा करा.
बारदाणा नाही म्हणून तुम्ही सोयाबीन खरेदी करत नाही. त्यामुळे शेतकर्यांना व्यापार्याला कमी भावाने सोयाबीन विकावा लागतो. हा केवळ कर्जत-जामखेड मतदारसंघाचा विषय नाही तर महाराष्ट्राचा विषय आहे. याची दखल सरकारने लवकरात लवकर घेऊन लक्ष घालावे असेही आ. पवार म्हणाले.
राम शिंदेंना संवैधानिक पद समजलेच नाही
सभापती राम शिंदे ज्या पदावर बसले आहेत ते संवैधानिक पद आहे. वरीष्ठ सभागृहातील सभापती पद हे महत्वाचे आहे. कदाचित त्यांना हे पद समजलेचं नाही. शिंदे यांची कर्जत-जामखेड येथे जल्लोषात मिरवणूक पार पडली. देशाचे दिवंगत पंतप्रधान मनमोहनसिंग हे मोठे नेते होते. सर्वच पक्षात त्यांना मान सन्मान होता. त्यांचा दुखवटा देशात पाळला जात असताना ही बाब राम शिंदे व कार्यकर्त्यांना समजली नाही. त्यामुळे त्यांनी जल्लोषात कार्यक्रम केला.