अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कर्जत- जामखेड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार रोहित पवार यांना मतदान करावे या उद्देशाने मतदारांना पैशांचे वाटप करताना दोघांना पकडले. जामखेड तालुक्यातील नान्नज व कर्जत तालुक्यातील वायसेवाडी शिवारात मंगळवारी सायंकाळी या घटना घडल्या आहेत. त्या दोघांकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली असून ते रोहित पवार यांच्या कारखाना व कंपनीशी संबंधित कर्मचारी असल्याचे समजते.
दरम्यान, याप्रकरणी कर्जत व जामखेड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. परि. महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बावणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल दत्तू जमदाडे (वय 40 रा. जळोची ता. बारामती, जि. पुणे) याच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम 173, 223 सह लोकप्रतिनिधित्व अधिनियम कलम 123 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमदाडे हा वायसेवाडी शिवारात दुचाकीसह मिळून आला. त्याच्याकडे 53 हजार 860 रूपये सापडले. तो विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना पैसे वाटप करत असल्याचे समोर आले आहे. त्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुळीक यांनी या संदर्भात अधिक तपास करत आहेत.
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाण्यात नेमणुकीला असलेले पोलीस अंमलदार आनंद धनवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मधुकर मारूती मोहिते (वय 50 रा. पारेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम 173, 223 व लोकप्रतिनिधीत्व कायदा कलम 123 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर मोहिते हा मंगळवारी (19 नोव्हेंबर) 5:50 वाजेच्या सुमारास नान्नज शिवारातील रस्ता लगत मिळून आला. त्याच्या ताब्यात 47 हजार रुपये व चिठ्ठ्या सापडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांना मतदान करावे या उद्देशाने मोहिते हा मतदारांना पैशाचे वाटप करत होता. त्याच्या ताब्यात चिठ्ठ्या मिळून आल्या आहेत. दरम्यान, तो कर्जत- जामखेड या विधानसभा मतदार संघातील रहिवाशी व मतदार नसतानाही तो त्याठिकाणी मिळून आल्याने त्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
मतदानाच्या आदल्या रात्री रोहित पवार यांच्यासाठी मतदारांना पैसे वाटप करताना त्यांच्याच कारखाना व कंपनीतील कर्मचारी पकडल्याने कर्जत- जामखेड मतदार संघात चांगलील चर्चा रंगली. दरम्यान, या मुद्द्यावरून आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. मतदानाच्या आदल्या रात्री मतदारांचा चांगलेच लक्ष्मी दर्शन झाले असल्याचे बोलले जात आहे.
हॉटेलमध्ये सव्वा चार लाखांची रोकड पकडली
आ.शिंदे यांचा नातेवाईक पैसे वाटत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
येथील लकी हॉटेलमध्ये संजय खंडप्पा खांडेकर (रा. कोंडवा बुद्रुक, पुणे) याच्याकडील चार लाख 29 हजार 500 रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती आमदार राम शिंदे यांची नातेवाईक असून तो पैसे वाटप करत होता असा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम यादव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे दीपक शिंदे यांनी केला आहे. यावेळी अरुण लाळगे, ज्ञानदेव लष्कर, सुमित भैलुमे यांच्यासह अनेक जण राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी (20 नोव्हेंबर) सायंकाळी चार वाजता लकी हॉटेलच्या रूममध्ये संजय खंडाप्पा खांडेकर हा व्यक्ती मतदार संघाच्या बाहेरील असतानाही विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार संघात वास्तव्यास मनाई असताना देखील लोकांना पैसे वाटण्याच्या उद्देशाने मिळून आला. त्याच्या ताब्यातून चार लाख 29 हजार 500 रुपये जप्त करून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना दीपक शिंदे, ज्ञानदेव लष्कर यांनी सांगितले की, कर्जत शहरातील लकी हॉटेल याठिकाणी आमदार राम शिंदे यांचे नातेवाईक असलेले संजय खांडेकर हे पैसे वाटत असल्याची माहिती मिळाली.
आम्ही त्याठिकाणी गेलो असता हॉटेलचा समोरील दरवाजा बंद करण्यात आला होता. तर पाठीमागील बाजूस असलेला दरवाजा उघडा होता व त्याठिकाणी एक पोलीस कर्मचारी बसलेला होता. त्या ठिकाणी आतमध्ये शिरत असताना त्या पोलीस कर्मचार्यांने आम्हाला अडवले व हॉटेलच्या रूमवर जाण्यासाठी प्रतिबंध केला. मात्र आम्ही तशाही परिस्थितीतवरती गेलो व रूममध्ये गेलो असता खांडेकर हे त्याठिकाणी पैसे वाटत असल्याचे दिसून आले. आम्हाला पाहताच त्यांनी ते लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही तो सर्व हस्तगत करून तात्काळ पोलिसांना बोलून घेतले असे त्यांनी सांगितले.