कर्जत |प्रतिनिधी| Karjat
जिल्ह्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात आ. संग्राम जगताप व धवलसिंह मोहिते यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचोली काळदात येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर, संबंधित दोषी आरोपींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच या प्रकरणात काही हिंदू युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, या मागण्यांसाठी सकल हिंदू समाज व ग्रामस्थांच्या वतीने चिंचोली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, जिल्हाधिकार्यांनी 7 ते 20 ऑगस्ट या कालावधीत परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला होता. असे असतानाही मागण्याबाबत चर्चा करून प्रश्न सोडवण्याऐवजी आंदोलकांनी बेकायदेशीर जमाव जमवला. कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने वरिष्ठ अधिकार्यांसह आंदोलकांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, तसेच राज्य मार्गावर आंदोलन न करण्याचे आवाहन केले. मात्र, अधिकार्यांचे सांगणे न ऐकता आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले. आंदोलन कर्जत ते जामखेड आणि श्रीगोंदा ते जामखेड या राज्य महामार्गावरील चिंचोली फाटा चौक येथे करण्यात आले. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्यामुळे येणार्या-जाणार्या वाहनांना अडथळा निर्माण झाला. यामुळे सर्वसामान्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवणे आणि सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. बळीराम काकडे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये आ. संग्राम जगताप, धवलसिंह मोहिते, आकाश सर्जेराव हाळनवर, शुभम अशोक माने, चंदनसिंग परदेशी, नितीन ईश्वर तोरडमल, वैभव पोपट काळदाते, सावन शेटे, उदयसिंग परदेशी, दीपक गांगर्डे, विठ्ठलसिंग शेडगे, रघुनाथ आबा काळदाते, धनंजय बांदल, बाळासाहेब निंबोरे, राहुल मते, प्रसाद कानगुडे, बालाजी लाळगे, सुनील यादव, ऋषिकेश काळदाते यांच्यासह इतर 100 ते 150 आंदोलकांचा समावेश आहे.
गुन्हा दाखल झाल्याने कार्य थांबवणार नाही – आ. जगताप
महाराष्ट्रात हिंदूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात जर या परिस्थितीत बदल झाला नाही तर प्रभू श्रीरामांचे धनुष्य, छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार व हनुमानाची गदा उचलण्यास प्रशासनाने हिंदू समाजाला भाग पाडू नये, असा इशारा नगरचे आ. संग्राम जगताप यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे. कर्जत रास्ता रोको प्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने मी हे कार्य थांबवणार नसून अशा गुन्ह्याने काही फरक पडत नाही. आंदोलन करणार्यांचे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळापासून थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण ते थांबलेले नाहीये. पोलिसांनी जनतेची दिशाभूल न करता आरोपींची खरी हिस्ट्री न लपवता जनतेपुढे आणावी, अशी मागणी आ. जगताप यांनी केली.




