अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर शहरात घरफोड्या, वाहनचोरी, दागिने हिसकावणे यासारख्या घटनांनी अक्षरशः कहर केला असून, सामान्य जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन निवेदन दिले. पोलीस यंत्रणेला जागे करा, अन्यथा रस्त्यावर येऊन आंदोलन करू असा थेट इशारा त्यांनी दिला.
यावेळी संपत बारस्कर, सुरेश बनसोडे, विपुल शेटीया, बाळासाहेब पवार, सुनील त्रिंबके, अभिजीत खोसे, गणेश बारस्कर, दीपक खेडकर यांच्यासह शहरातील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. जगताप म्हणाले, अहिल्यानगरमधील तोफखाना, कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्यांचे आणि वाहनचोरीचे सत्र सुरूच आहे. बंद घरे फोडली जात आहेत, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे उघड्यावर हिसकावली जात आहेत आणि घरासमोरील वाहनांना संरक्षण राहिलेलं नाही. अवघ्या 2 दिवसांत चार चारचाकी वाहने चोरीस गेली आहेत.
पोलिसांची गस्त केवळ कागदोपत्री आहे का? शहराच्या मध्यवर्ती भागातील कपड्याच्या दुकानातही चोरी झाली असून, चोरटे सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाले आहेत. मात्र, पोलीस आजही कोणतीही ठोस कारवाई करू शकलेले नाहीत. एवढंच नव्हे तर, निवेदनात पोलीस काही अवैध धंद्यांना पाठीशी घालतात, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
राजकीय पातळीवरून थेट पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकणार्या या हालचालीमुळे शहरातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आता प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कायदा-सुव्यवस्थेचं काय ?
आ. जगताप म्हणाले, रात्री 11 नंतर शहरात गुन्हेगारांची सर्रास वर्दळ दिसते. गुन्हेगारीत वाढ होत असून, पोलिसांचे नियंत्रण सुटल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ही परिस्थिती अतिशय धोकादायक आहे. नागरिक त्रस्त झाले असून, पोलिसांनी तात्काळ परिणामकारक कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू.




