शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबा मंदिर परिसरात असलेल्या अब्दुल बाबांच्या समाधीस्थळी भाविकांकडून येणारा पैसा बाहेरच्या व्यक्तींकडून गोळा करण्यात येतो. ते तत्काळ बंद करावे अन्यथा ग्रामस्थांशी विचार विनीमय करून पुढील निर्णय घेवू, असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी दिला.
साई मंदिर परिसरात साईबाबांच्या काळातील तात्यापाटील कोते, भाऊ महाराज कुंभार, अय्यर यांच्यासह हाजी अब्दुल बाबा आशा चार समाध्या आहेत. अन्य तीन समाधीवर जमा होणारा पैसा संस्थानच्या तिजोरीत जमा होतो. मात्र अब्दुल बाबांच्या समाधीस्थळी जमा होणारा पैसा बाहेरचे काही खासगी लोक घेवून जातात. हे कायद्याला व संविधानाला धरून नाही. साई संस्थानने त्याला प्रतिबंध करावा, अशी मागणी आ. जगताप यांनी केली.
एकाला एक न्याय व दुसर्याला वेगळा न्याय असे नको. हा सगळा पैसा संस्थान किंवा सरकारच्या तिजोरीत जमा झाला पाहिजे. याबाबत आम्ही साईबाबा संस्थान व शासनाला निवेदन देणार आहोत. शिर्डीत पक्षाच्या शिबिराला आलो आहे. त्यामुळे वेगळी भूमिका मांडणार नाही. केवळ शिर्डीबाबत सर्वांच्या भावना जोडल्या गेलेल्या असल्याने याबाबतची भूमिका मांडली. आता मांडत असलेली भूमिका व पक्षाचे व्यासपीठ हे दोन्ही वेगवेगळे असल्याचा खुलासाही आमदार जगताप यांनी केला.