नाशिक । प्रतिनिधी Nashik
उच्च शिक्षण विभागांतर्गत बी.एड आणि एम.एड या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) मुदतवाढ दिली आहे. परंतु, विद्यार्थ्यांच्या अजूनही काही समस्या असल्याने ही मुदतवाढ पुरेशी नाही. परिणामी दि.31 जुलैपर्यंत ही मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत आ. सत्यजित तांबे यांनी याबाबत मुदतवाढीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
पत्रात म्हटले आहे, बी.एड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आतापर्यंत 47 हजार 373 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे. तर त्यातील 41 हजार 739 विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले आहेत. तर 30 हजार 711 विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी झाली आहे. तर एम.एड अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत एक हजार 490 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यातील एक हजार 118 विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक झाले आहेत.
दोन्ही अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले होते. परंतु, अनेक विद्यार्थी बी.एड आणि एम.एड प्रवेशापासून वंचित राहणार आहेत. तरी राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने बी.एड आणि एम.एड या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची ऑनलाइन नोंदणी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ करावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी किंवा इतर कोणतीही अडचण असल्यास ती सोडविण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, असे आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले.