Thursday, May 23, 2024
Homeनगरमला व कुटुंबियांना राजकीय जीवनातून संपवण्याचा विरोधकांचा डाव

मला व कुटुंबियांना राजकीय जीवनातून संपवण्याचा विरोधकांचा डाव

सोनई |वार्ताहर| Sonai

मला व माझ्या कुटुंबियांना राजकीय जीवनातून संपवण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केला.

- Advertisement -

नुकत्याच नेवासा तालुका दूध संघास 10 ते 12 वर्षांपूर्वी जुन्या वीज चोरीचे कारण दाखवून राजकीय दाबावातून प्रशांत गडाख संचालक असलेल्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा अनुषंगाने रविवार दि 5 रोजी सोनई येथे माजी खासदार यशवंतराव गडाख, आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

प्रास्ताविक पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे यांनी केले. याप्रसंगी आमदार शंकरराव गडाख म्हणाले, मी राजकिय भावना ठेवून जाणीवपूर्वक कधीही कुणाला त्रास दिला नाही, तालुक्याच्या विकासाची भावना ठेवून सदैव जनतेच्या कामासाठी कटिबद्ध आहे.

तालुक्यातील विरोधकांनी वेळोवेळी मला व्यक्तिगत त्रास देण्याचा ससेमीरा सुरूच ठेवला आहे. यातून अनेक गुन्हे दाखल करून खोट्यानाट्या चौकशा लावून मला व कुटुंबाला राजकीय जीवनातून संपवण्याचा डाव विरोधकांनी सुरू ठेवला आहे ही बाब अतिशय निंदनीय अशीच आहे.

प्रशांत गडाख आजारी असताना देखील त्यांचेवर गुन्हे दाखल करून कारवाईला सामोरे जाण्यास लावण्याचा विरोधकांचा डाव चुकीचा आहे. तालुक्यातील दूध उत्पादकांची गैरसोय दूर व्हावी दुधाला हक्काची बाजारपेठ मिळावी या हेतूने मोठ्या अडचणीत नेवासा तालुका दूध संघाची स्थापना करून दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधकांनी सूडबुद्धीने कारवाई केल्यामुळे तालुका दूध संघ बंद करण्याची वेळ आली आहे.

विकासात्मक बाबीवर राजकारण व्हावे यासाठी मी नेहमी तयार आहे परंतु कौटुंबिक हल्ले करून सूडबुद्धीचे राजकारण विरोधकांनी करू नये, असेही आ. शंकरराव गडाख म्हणाले.

तालुक्यातील विरोधकांच्या घरातही काही घटना दुर्दैवाने घडल्या. त्या घटनेचे भांडवल करण्याऐवजी मी त्यांना मदत करून प्रश्न सोडविण्यास हातभार लावला परंतु दुर्दैवाने मला व कुटुंबाला अडचणीत आणण्याचे व संस्था बंद पडण्याचे काम तालुक्यातील विरोधकांकडून सुरू आहे असे ते म्हणाले.

माजी खासदार यशवंतराव गडाख म्हणाले, मोठ्या कष्टाने तालुक्यात आपण संस्थांचे जाळे उभारले आहे. या संस्था बंद पाडण्याचे पाप विरोधकांकडून होत आहे. हा डाव आपण शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली कदापीही यशस्वी होऊ देणार नाही. प्रशांत गडाख 2 वर्षांपासून आजारी असतानादेखील गुन्हे दाखल होतात व कारवाईला सामोरे जावे लागते याचे वाईट वाटते असे ते म्हणाले.

याप्रसंगी अशोकराव गायकवाड, बाळासाहेब काळे, काकासाहेब गायके, सोपान महापूर, बाळासाहेब शिंदे, श्रीरंग हारदे, शरदराव आरगडे, जानकीराम डौले, शरद जाधव आदींनी आपल्या मनोगतातून राजकीय सूडभावनेने तालुक्यातील विरोधकांनी केलेल्या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

यावेळी आजारी प्रशांत गडाख यांचेवर करण्यात आलेल्या कारवाईचा कार्यकर्त्यानी हात उंचावून घोषणा देऊन उत्स्फूर्तपणे निषेध नोंदवला. यप्रसंगी नेवासा तालुक्यातील गावा गावांतून कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

स्व. प्रतीक काळे या माझ्या मुलाच्या निधनानंतर दुःखात पाठबळ देऊन माझे व कुटुंबाचे अश्रू पुसण्याऐवजी आमच्या दुःखाचे राजकीय भांडवल करून राजकीय पोळी भाजवणार्‍या माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना भर रस्त्यात जाब विचारणार

– बाळासाहेब काळे तेलकुडगाव

विरोधकांविरोधात रोष

गडाख कुटुंबाला वेळोवेळी त्रास देऊन गुन्हे दाखल करणार्‍या नेवासा तालुक्यातील राजकीय विरोधकांविरोधात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मोठा रोष दिसून आला. भर उन्हात दोन ते अडीच तास चाललेल्या मेळाव्यात कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे बसून होते.

लढ्याला माझे आशीर्वाद – यशवंतराव गडाख

गेल्या 50 वर्षांपासून जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे परंतु इतका सूडबुद्धीने त्रास आजपर्यंत कुणीही दिला नाही. फक्त राजकीय लालसेने पेटलेल्या विरोधकांनी तालुक्याच्या राजकारणाची पातळी सध्या पुरती खालावून टाकली असून याला आपण एकसंघ होऊन उत्तर दिले पाहिजे. गडाख कुटुंबावर कितीही हल्ले करून, केसेस दाखल करून त्रास देण्याचा प्रयत्न झाला तरी संकटांना सामोरे जाऊन जनतेसाठी खंबीर होऊन शंकरराव व कार्यकर्त्यांनी लढा सुरूच ठेवावा. माझे त्याला आशीर्वाद आहेत,असे माजी खासदार यशवंतराव गडाख म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या