अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहर सेवादल काँग्रेसच्या माध्यमातून नगर शहरामध्ये विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवावेत.
या माध्यमातून शहरातील विविध समाज घटकांतील काम करणार्या व्यक्तींना कार्यकारिणी करताना संधी द्यावी, असे प्रतिपादन काँग्रेसचे आ.डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.
शहर सेवादलाच्या आयोजित बैठकीत आ. तांबे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर दीप चव्हाण, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, सेवादलाचे नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, डॉ. रिजवान शेख, विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष दानिश शेख आदी यावेळी उपस्थित होते.
आ. डॉ. तांबे म्हणाले, सेवादल काँग्रेस ही काँग्रेस पक्षाची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची फ्रंटल आहे. सेवादल विभागाला स्वातंत्र्यपूर्व काळाचा मोठा इतिहास आहे. सेवादलाच्या माध्यमातून आजवर राज्य आणि देशपातळीवरती काँग्रेस पक्षाने अनेक महत्त्वाचे कार्यक्रम राबविले आहेत.
नगर शहरामध्ये सेवादलाची कार्यकारिणी करत असताना समाजामध्ये सामाजिक कार्य करणार्या मंडळींना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी द्यावी. त्यामाध्यमातून समाजामध्ये काँग्रेस पक्षाचे विचार रुजवावेत.
यातून प्रशिक्षित झालेला कार्यकर्ता हा भविष्यात काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात जाऊन निश्चितपणे प्रभावी काम करू शकतो, असा विश्वास आ.तांबे यांनी यावेळी व्यक्त केला. सेवादलाचे शहराध्यक्ष मनोज लोंढे म्हणाले की, महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, आ. सुधीर तांबे, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मला काम करायची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
किरण काळे यांच्यासारखा तरुण तडफदार शहर जिल्हाध्यक्ष काँग्रेसला लाभला आहे. त्यांच्यासमवेत सेवादल खांद्याला खांदा लावून काम करेल. सेवादल विभागाची लवकरच शहर जिल्हा कार्यकारिणी गठित करून वरिष्ठांच्या मान्यतेने ती जाहीर केली जाईल. यावेळी मेजर रफिक शेख, वैशाली दालवाले, संगीता पाडळे, उषाताई भगत, दादासाहेब सोनाने आदी उपस्थित होते.