Tuesday, September 17, 2024
Homeनगरआ. थोरात यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ तर आ. तनपुरेंना ‘उत्कृष्ट वक्तृत्व’ पुरस्कार

आ. थोरात यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ तर आ. तनपुरेंना ‘उत्कृष्ट वक्तृत्व’ पुरस्कार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे 2018 – 19 चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाला आहे. 1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना आमदार थोरात यांनी सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर राज्यात महसूल, कृषी, शालेय शिक्षण अशी महत्त्वाची पदे भूषवताना अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. पक्षाशी एकनिष्ठता, नेतृत्वाचा विश्वास, मोठा जनाधार, शांत संयम व सुसंस्कृत नेतृत्व अशी आ.थोरात यांची राज्यभर ओळख असून महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, साहित्य कला, क्रीडा, शिक्षण, कृषी, सहकार अशा सर्व क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

विधानसभेत अभ्यासपूर्ण मांडणी, प्रत्येकाचा सन्मान यामुळे आ. थोरात यांना यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार म्हणून राज्यात गौरविले जाते. जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे पूर्ण करताना तालुक्यात प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबविल्या आहेत.समृद्ध सहकार, शिक्षण, मोठी बाजारपेठ चांगले वातावरण यामुळे संगमनेर तालुका हे ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरले आहे. आ. बाळासाहेब थोरात यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर सातत्याने दिशादर्शक काम करत आहेत.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे 2018 – 19 साठी विधानसभेतून उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे. या पुरस्काराचे वितरण 3 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते मध्यवर्ती सभागृह विधान भवन, मुंबई येथे होणार असून यावेळी राज्यपाल मुख्यमंत्री यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आ. थोरात यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून उत्कृष्ट संसदपटू या पुरस्कारामुळे संगमनेर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या पुरस्कारामुळे संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आ. तनपुरे यांना विधिमंडळ उत्कृष्ट वक्तृत्व पुरस्कार

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

दोन्ही विधिमंडळ सभागृहातील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट वक्तृत्वासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन 2023-24 या वर्षात आ.प्राजक्त तनपुरे यांना उत्कृष्ट वक्तृत्वासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. नगर जिल्ह्यातील केवळ दोनच विधानसभा सदस्यांना पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना आ. प्राजक्त तनपुरे म्हटले, राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या वतीने 2023-24 सालासाठी विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट वक्तृत्वासाठी देण्यात येणार्‍या ‘उत्कृष्ट वक्तृत्व’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला विधानसभेत निवडून पाठविले. तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे.

विधिमंडळात जनहिताचे मुद्दे मांडताना शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमचे प्रेरणास्थान खा. शरदचंद्रजी पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खा. सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद व वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन तसेच माझ्या मतदार संघातील जनता यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. हा बहुमान मी माझ्या मतदार संघातील जनता, आई-वडील तसेच वडीलधार्‍या नेतृत्वाला कृतज्ञता पूर्वक समर्पित करतो. जनहिताचे काम करण्यासाठी मिळालेली ही उर्जा आपल्या सर्वांच्या साथ राहील हा विश्वास आहे. असे आ. प्राजक्त तनपुरे यांनी सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या