राहाता |प्रतिनिधी| Rahata
माझ्यावर समन्यायीचा आरोप करणारे तेव्हा कुठे होते? मंत्रिमंडळात तुम्हीही होता मग का नाही बोललात? संगमनेरमधून आम्ही भूमिका घेत समन्यायीबद्दल विरोध दर्शविला. महसूलमंत्री असताना आम्ही खोट्या केसेस करून लोकांना जेलमध्ये टाकले नाही. गणेश कारखान्यात इतिहास का घडला हे विसरू नका कारण जर आपण ते विसरलो तर पुन्हा सगळं जैसे थे होईल, अशी टीका करत आ.बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नाव न घेता प्रतिहल्ला चढवला. काही दिवसांपूर्वी ना.विखे यांनी थोरातांवर समन्यायी आणि महसूल मंत्रीपदावरून टीका केली होती.
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर पार पडली. यावेळी माजी महसूलमंत्री आ.थोरात बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेक कोल्हे, प्रभावतीताई घोगरे, चेअरमन सुधीर लहारे, व्हा.चेअरमन विजय दंडवते व सर्व आजी-माजी संचालक मंडळ, लताताई डांगे, सुधीर म्हस्के, गंगाधर चौधरी, शिवाजी लहारे, चंद्रभान गुंजाळ, नानासाहेब गव्हाणे, चंद्रभान धनवटे, सर्जेराव जाधव, बलराज धनवटे, महेंद्र शेळके, रामचंद्र बोठे, उत्तम मते, भाऊसाहेब थेटे, संजय सरोदे, डॉ.वसंत लबडे, उत्तमराव घोरपडे, प्रकाश मोठे, अविनाश दंडवते, विक्रांत दंडवते आदींसह अधिकारी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्ही चांगले करण्यासाठी आलो आहोत. या भागात असणारे पाण्याचे आणि जनजीवनाशी निगडित समस्या सोडविण्यासाठी जे शक्य असेल ते प्रयत्न आमचे आहेत. गणेश सहकारी साखर कारखाना अनेक अडचणींवर मात करून पुढे जात आहे. आर्थिक घडी बसविताना संजीवनी आणि संगमनेर यांची मदत असेलच, त्यामुळे येणार्या हंगामात गतवर्षीपेक्षा अधिक गाळप करण्यात कारखाना यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विवेक कोल्हे म्हणाले, गणेश कारखान्याचे जुने साहित्य पूर्वीच्या काळात कसे विकले, याची चौकशी करण्यासाठी तक्रार केलेली आहे.
कारखाना जिल्ह्यात सर्वोत्तम चालावा यासाठी प्रयत्नशील आहे. ऊस वाढीसाठी सभासदांनी मोहीम हातात घेऊन जास्तीत जास्त ऊस वाढवला पाहिजे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा घेणारा कारखाना आपण करून दाखवला. कारण सर्वांची जिद्द होती. मागील कालखंडात काय राजकारण झाले हे सर्वांना ठाऊक आहे. कशा अडचणी निर्माण केल्या गेल्या हे सर्वांना ज्ञात आहे. संस्था नफ्यात येण्यासाठी आपली सामूहिक शक्ती महत्वाची आहे. गणेश परिसरातील काही बंधारे भरले आहेत. मात्र काही अद्याप भरणे बाकी आहे. येत्या काळात त्याकडे आपले लक्ष असणार आहे.
गणेशचा इतिहास का घडला हे विसरू नका
राजकीय विरोधक कितीही अडथळे आणत असतील तरी कारखाना यशस्वीपणे चालवून दाखवला. यापुढे देखील ताकदीने चालवू. कारखान्यासाठी ऊस जास्त कसा वाढेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सर्वांनी जिद्द दाखवली म्हणून मागील हंगामात कारखाना सुरळीत चालला. त्याबद्दल विवेक आणि संचालक मंडळाचे कौतुक आहे. पण गणेश कारखान्यात इतिहास का घडला हे विसरू नका, असे आवाहनही आ.थोरात यांनी केले.
हिताच्या आड येणार्यास जनता धडा शिकवेल
कारखाना चांगला चालला पाहिजे यासाठी विविध माध्यमातून सहाय्य उभे करण्याचा प्रयत्न आहे, त्यासाठी राजकीय पाठबळ गरजेचे असते. यापुढे जो गणेश कारखानाच्या हिताच्या आड येईल त्याला येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल, असा इशारा विवेक कोल्हे यांनी दिला.