मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षारक्षकाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याने आमदार वरुण सरदेसाई चांगलेच संतापले. नीलम गोऱ्हे यांनी देखील ‘मुद्दापहून धक्का लागलेला नाही, मी नम्रपणे सांगतेय तरी तुम्ही खेकसताय, ही कुठली तुमची संस्कृती’, असे म्हटले. या घटनेमुळे विधानभवन परिसरात चांगलाच गोंधळ उडाला.
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे विधानभवनात जात असताना आमदार वरुण सरदेसाई यांना बॉडीगार्डचा धक्का लागल्याने संताप व्यक्त केला. ‘इथे काय अतिरेकी घुसलेत, दुसऱ्यांदा धक्का लागला मला, दुसऱ्यांदा झाले हे, असे कसे धक्के लागतात?’ असा सवाल वरुण सरदेसाई यांनी केला. यानंतर नीलम गोऱ्हे थोडे पुढे निघून गेल्या आणि ‘मुद्दामहून धक्का लागलेला नाही, मी नम्रपणे सांगतेय तरी तुम्ही खेकसताय, ही कुठली तुमची संस्कृती’, असे म्हणाल्या. यानंतर नीलम गोऱ्हे विधानभवनात निघून गेल्या.
सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दुपारच्या वेळी उपसभापती नीलम गोऱ्हे विधिमंडळातून मुख्य द्वारातून बाहेर पडल्या. त्यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या सुरक्षारक्षकांकडून आजूबाजूला असलेले लोक हटविण्यात आले. यादरम्यान त्यांनी आमदार वरुण सरदेसाई यांनाही बाजूला ढकलले. हे पाहून सरदेसाई यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासमोरच सुरक्षारक्षकांना सुनावले.
उपसभापतींसाठी टेरेसवर विमान उतरवा
आम्ही आमदार आहोत जे जर कुणी ओळखत नसेल, त्यासाठी आम्ही आमच्या खिशाला बिल्ले लावतो. उपसभापतींसाठी वेगळी बस आणा, नाहीतर त्यांच्यासाठी विधान भवनाच्या टेरेसवर थेट विमान उतरवा. माझ्यासोबत हे दुसऱ्यांदा घडले. यांच्यासोबत कुणीही ऐरे गैरे येतात, असले फालतू प्रकार बंद झाले पाहिजेत, अशा शब्दात वरुण सरदेसाई यांनी आपला संताप व्यक्त केला. विधान भवनाच्या आवारात आमदार जर चालत असतील तर उपसभापतींच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना धक्काबुक्की करणे योग्य आहे का, याचे उत्तर आम्हाला मिळाले पाहिजे, असे सरदेसाई म्हणाले.
गेल्यावेळीही मी पायऱ्यांवर उभे असताना मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमदार येत असतात, सगळ्यांना ओळखणे शक्य नसते. यासाठीच तर आम्ही आमच्या छातीवर बिल्ले लावतो ना… आमदारांना चालायला जागा तर द्या.. एवढेच माझे म्हणणे आहे, असेही वरुण सरदेसाई म्हणाले.
दरम्यान, सरदेसाई यांच्या धक्काबुक्कीच्या आरोपावर नीलम गोऱ्हे यांनीही लगेच प्रतिक्रिया दिली. आमदार सरदेसाई यांना मुद्दाम धक्का लागलेला नाही हे नम्रपणे सांगतेय तरीही ते माध्यमांसमोर खेकसतायेत, ही कुठली पद्धत आहे… असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




