श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सध्या श्रीरामपूर नगरपालिकेचे नगरसेवक कोण कोणत्या गटात आहेत याबाबत निश्चित धोरण नसल्यामुळे जिकडे वातावरण फिरेल तिकडचे नेतृत्व मान्य करत असतात. त्यामुळे विखे यांनी काल झालेल्या बैठकीत आधी कुणासोबत राहायचे ते ठरवा अशा शब्दांत ‘त्या’ नगरसेवकांना खडसावल्यामुळे नगरसेवकांमध्ये चलबिचल झाली आहे. त्यामुळे पुढील बैठकीपर्यंत कोणाचे नेतृत्व मान्य करायचे? याबाबत बहुतांश नगरसेवकांना स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे.
रविवारी दुपारी विखे समर्थकांची बैठक श्रीरामपुरात झाली. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार, पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे, भाजपाचे प्रकाश चित्ते, गिरीधर आसने, नगरसेवक बाळासाहेब गांगड, अंजूम शेख, शामलिंग शिंदे, किरण लुणिया, राजेश अलघ, दीपक चव्हाण, महंमद शेख, मुख्तार शहा, विजय शेळके, कलीम कुरेशी, ताराचंद रणदिवे, केतन खोरे आदी उपस्थित होते. नगरसेवक रवींद्र गुलाटी यांनीही बैठक संपण्याच्या वेळी हजेरी लावली.
नगरसेवक किरण लुणिया यावेळी म्हणाले, श्रीरामपूर नगरपालिकेत कोणते नगरसेवक कोणत्या पक्षाचे आहेत; किंवा कोणाच्या नेतृत्वाखाली काम करतात हे अजिबात समजत नाही. सकाळी एका गटासोबत, दुपारी दुसर्या गटात दिसतात तर संध्याकाळी वेगळ्याच ठिकाणी दिसतात. आज बहुतांश नगरसेवक आम्ही तुमचेच नेतृत्व करतो असे आपणास सांगत आहेत मग जे कोणी तुमच्या नेतृत्वाखाली काम करत असतील त्यांना स्पष्ट भूमिका घ्यायला लावा. यावर अनेक नगरसेवकांनी आपापली भूमिका मांडली. यावेळी आ. विखे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले.
आ. विखे म्हणाले, यापुढे आपल्याला श्रीरामपूरच्या विकासासाठी एकत्र यायचे आहे. त्यामुळे सर्वांनी आपापली भूमिक स्पष्ट करुन कोणाकडे राहायचे आणि कोणाचे नेतृत्वाखाली काम करायचे हे ठरवून निष्ठेने रहावे. इकडे-तिकडे किंवा मी तुमचाच हा दुटप्पीपणा यापुढे चालणार नाही. याबाबत पुढील बैठकीत आपण याबाबत स्पष्टपणे ठरविणार असल्याचे यांनी सांगितल्याने आता नगरसेवकांपुढे कोणाचे नेतृत्व स्विकारावे असा पेच निर्माण झाला आहे. आ. विखे हे प्रत्येकाशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहे व त्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे पुढील बैठकीत कोण कुणाचा हे चित्र स्पष्ट होणार आहे.