मुंबई | Mumbai
विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad) पाच रिक्त जागांसाठी गुरुवार (दि. २७) मार्चला निवडणूक (Election) पार पडणार आहे. त्यापैकी तीन जागा भाजपच्या (BJP) वाट्याला आल्या आहेत, तर प्रत्येकी एक जागा ही शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली आहे. महायुतीमधील (Mahayuti) भाजपकडून माजी आमदार दादाराव केचे, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आणि संजय केनेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shinde Shivsena) चंद्रकांत रघुवंशी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने संजय खोडके यांना संधी दिली आहे. महायुतीचे संख्याबळ पाहता या पाच जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज (Application For Candidacy) दाखल करण्याचा आज (सोमवार) शेवटचा दिवस आहे. उद्या (दि. १८ मार्च) रोजी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर गुरुवार (दि. २०) मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर, गुरुवार (दि.२७ मार्च) रोजी मतदान (Voting) पार पडणार असून त्याच दिवशी निकाल घोषित होणार आहे. पंरतु, पाचपेक्षा अधिक अर्ज आले नाहीत तर निवडणूक बिनविरोध (Unopposed) होऊ शकते.
दरम्यान, विधानपरिषदेत पाच जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी ७८ पैकी ५२ सदस्य आहेत. यामध्ये ३२ आमदार महायुतीचे (Mahayuti) आहेत. तर, महाविकास आघाडीकडे १७ आमदार आहेत. यात भाजपचे १९, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ६ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ७ आमदार आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) १७ आमदारांमध्ये काँग्रेसचे ७, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे ३ आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे ७ आमदार आहेत. तर, तीन अपक्ष आमदार (MLA) आहेत.
एकाच घरात असणार दोन आमदार
विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी २७ मार्चला निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अमरावतीचे राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या आमदार आहेत. त्यामुळे आता हे पती-पत्नी एकाच पक्षातून एकाच घरात आमदार म्हणून पाहायला मिळणार आहेत.
अशी आहे महाराष्ट्र विधानपरिषदेची रचना
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या ७८ इतकी आहे. विधानसभेप्रमाणे विधानपरिषद दर ५ वर्षांनी भंग होत नाही. विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. ७८ सदस्यांपैकी ३० सदस्य विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जातात. तर २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून मतदानाद्वारे निवडून दिले जातात. तसेच शिक्षकांमधून ७ आमदार, पदवीधरांमधून ७ आमदार निवडले जातात. तर, राज्यपाल साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातून १२ आमदारांची नियुक्ती करतात.