मुंबई | Mumbai
सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेद्वारे स्वतःचं कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. बदलापूरमधील अत्याचार प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच धारेवर धरले आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
“बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणले तसे, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटले,” असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
मुळात ठाणे हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेद्वारे स्वत:चं कौतुक करून घेण्यात मग्न आहे. पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं हे पहिलं कर्तव्य नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
हे ही वाचा : बदलापूर प्रकरणातील आरोपीला ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचे आहे, अशी मागणीही राज ठाकरे यांनी यावेळी केली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा