Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : "बेसावध राहू नका, हीच क्रांतीची वेळ"; राज ठाकरेंचे पॉडकास्टच्या...

Raj Thackeray : “बेसावध राहू नका, हीच क्रांतीची वेळ”; राज ठाकरेंचे पॉडकास्टच्या माध्यमातून मतदारांना आवाहन

मुंबई | Mumbai

आज राज्यभरात दसरा, विजयादशमीनिमित्ताने दसरा मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर आज राज्यात एकूण चार महत्त्वाचे दसरा मेळावे होणार आहेत. पंरतु, त्याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी दसऱ्यानिमित्त राज्यातील जनतेशी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांशी पॉडकास्टच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत मतदानावेळी बेसावध राहू नका असे म्हणत महाराष्ट्र साकारण्यासाठी मला संधी द्या असं आवाहनही त्यांनी केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदूंना आवाहन; म्हणाले, “दुर्बलता…”

यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की,”महाराष्ट्राचं सोनं लुटलं जातंय आणि तुम्ही जाती-पातीत मश्गूल आहात.येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी क्रांती केली पाहिजे, त्यामुळे बेसावध राहू नका. महाराष्ट्राचं सोनं तर गेले अनेक वर्ष लुटलं जातंय, आणि आम्ही फक्त आपट्याची पानं एकमेकांना वाटत आहोत. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही राहत नाही आणि बाकीचे सगळे सोनं लुटून चालले आहेत, पण आमचं दुर्लक्ष … आम्ही कधी आमच्या आयुष्यात मग्न तर कधी जाती-पातीमध्ये मश्गुल. आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी? आजचा दसरा निवडणुकीच्या तोंडावर आहे. त्यामुळे तुम्ही बेसावध राहून चालणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “दरवेळी तुम्ही बेसावध राहता आणि राजकीय पक्ष आपआपले राजकीय खेळ करत राहतात. याच्यात महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे? नुसते रस्ते, पूल बांधणे ही प्रगती नसते. प्रगती समाजाची व्हावी लागते. परदेशातले देश पाहतो त्याला प्रगत देश म्हणतात. आपण चाचपडत आहोत. एवढं सगळं होऊनही तुमच्यातला राग व्यक्त होताना दिसत नाही. त्याच त्याच लोकांना दरवेळी निवडून देता आणि पश्चातापाचा हात डोक्यावर मारता. मतदानाचे शस्त्र तुम्ही वर ठेवता आणि नंतर बाहेर काढून बोलता. मग मतदानाच्या दिवशी तुम्हाला काय होतं? असं करुन राष्ट्र उभं राहत नाही. आज संधी आलेली आहे म्हणून माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, असेही राज ठाकरेंनी म्हटले.

तसेच महाराष्ट्रातील तरुण-तरुणी, शेतकरी, सर्वसामान्य व्यक्तींना माझी हात जोडून विनंती आहे की, येणाऱ्या निवडणुकीत बेसावध राहू नका. शमीच्या झाडावरील शस्त्र आता उतरवा. ही क्रांतीची वेळ आहे. ही वचपा घेण्याची वेळ आहे. या सगळ्यांचा तुम्हाला वेध घ्यावा लागेल. गेली अनेक वर्ष आणि खासकरून गेली पाच वर्ष तुमच्या मतांची ज्यांनी प्रतारणा केली ज्यांनी तुम्हाला गृहीत धरलं, वेड्यावाकड्या युती आणि आघाड्या करत बसले. आज बोलतील सगळेजण एकमेकांचे उणीधुणी काढतील. पण, त्याच्यात तुम्ही कुठे असणार? तुम्ही यात नसणार आहात. मी गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राचे स्वप्न पाहत आहे. हे स्वप्न साकारण्याची संधी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मिळू द्या. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र बनवणे हेच माझं स्वप्न आहे. तदानाच्या दिवशी या सगळ्या लोकांचा तुम्ही वेध घ्या,” असे आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या