मुंबई | Mumbai
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे बंधू उद्धव ठाकरे यांना मातोश्री या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. राज-उद्धव या ठाकरे बंधुंच्या अचानक भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेय. अनेकांनी या भेटीचे स्वागत केलेय तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळाला. त्यासोबत राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुनही मोठ्या भावाला शुभेच्छा दिल्या. एक्सवर शुभेच्छा देताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे’ असा केला. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच अधिकृत शिवसेना असल्याचेच राज ठाकरे यांनी या शुभेच्छा संदेशातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आल्यानंतर मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील अंतर कमी होताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने युतीबाबत अजून काही ठरले नाही, असे सांगितले जात असले तरी राजकीय अर्थ काही लपून राहिला नाही. अशातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आल्याचे दिसून आले. कारण होते, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरेंची भेट घेत शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर केलेल्या पोस्टवरुन राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?
आज राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर सोशल मीडियावर भेटीचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हटले की, “माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या..”
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या पक्षनावाचा उल्लेख न करता थेट शिवसेना असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना पक्षप्रमुख’ म्हटले आहे. यामुळे खरी शिवसेना कोणाची याची अधिकृत घोषणाच राज यांनी उद्धव ठाकरे यांच्या 65व्या वाढदिवशी करुन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाचे सर्वात मोठे गिफ्ट दिल्याचे मानले जात आहे.
राज ठाकरेंच्या या एका वाक्यात अनेक अर्थांचे अर्थ लपले असल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा केल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पहायला मिळत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





