मुंबई | Mumbai
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलतांना ‘घाटकोपरची भाषा गुजराती आहे, तर गिरगाव येथे हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणाऱ्याला मराठी बोलता (Marathi Language) आलंच पाहिजे असं काही नाही”, असे वक्तव्य केले होते. भैय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटत असून विरोधकांकडून जोशी यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. अशातच आता जोशी यांच्या विधानाचा मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चांगलाच समाचार घेतला आहे.
राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भैय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं…. आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता.
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ? सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत . हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ? आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येऊन मराठीत बोलून गेले . त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? या असल्या काड्या घालून (अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे ! बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच! महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं! असा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विधानसभेत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, “भैय्याजी जोशी यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही, ते पूर्णपणे ऐकून माहिती घेऊन बोलेन. पण सरकारची भूमिका पक्की असून मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता यायल पाहिजे. माझ्या या वक्तव्यात भैय्याजी जोशी यांचं दुमत असेल असं मला वाटत नाही. इतर कोणत्याही भाषेचा अपमान करणार नाही, सर्व भाषांचा सन्मान आहे. जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो तो दुसऱ्याही भाषेवर प्रेम करू शकतो म्हणूनच शासनाची भूमिका पक्की असून शासनाची भूमिका मराठी” असल्याचे त्यांनी सांगितले.