Thursday, December 12, 2024
Homeनाशिकमनसेनेला नाशिकमध्ये पुन्हा गटबाजीचे ग्रहण?

मनसेनेला नाशिकमध्ये पुन्हा गटबाजीचे ग्रहण?

नाशिक । फारूक पठाण

नाशिकमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेत पुन्हा गटबाजी उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गत काही काळात पक्षप्रमुख राज ठाकरे व युवा नेते अमित ठाकरे यांचे लक्ष कमी झाल्याचा परिणाम झाल्याची देखील चर्चा आहे. नाशिक तसा एके काळी मनसेनेचे बालेकिल्ला म्हणून प्रसिध्द होता, मात्र मागील काही काळात पक्षातील काही नेत्यांमुळे गटबाजी वाढल्याने त्याचा परिणाम थेट पक्षाच्या कामगिरीवर झाल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

त्यामुळे राज ठाकरे व अमित ठाकरे यांना पुन्हा मैदानात येऊन संघटन बांधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे चित्र आहे. नुकताच लोकसभा निवडणूक संपली. मनसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त महायुतीला अर्थात एनडीएला पाठिंबा दिला होता. त्यामुळे नाशिकमध्ये देखील महायुतीचे उमेदवार माजी खासदार हेमंत गोडसे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने साथ दिली. त्यासाठी एक भव्य मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता. त्यात युवा नेते अमित ठाकरे येणार होते, मात्र ते आले नाही. तरी पक्षाचे इतर तीन वरिष्ठ नेत्यांना मुंबईहून पाठविण्यात आले होते.

निवडणुकीत महायुतीचे उमेदवार गोडसे पराभूत झाल्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष असलेले पराग शिंत्रे यांनी एक मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. त्यात काही निवडक पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील बोलवण्यात आले होते. तर त्यावेळी त्यांच्या भावना इन कॅमेरा रेकॉर्ड करण्यात येऊन ते राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन होते. मात्र त्यापूर्वीच मिसळ पार्टी सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने एक प्रकारे तो पक्षाचा शिस्तभंग झाल्याचे सांगण्यात आले. तर राज ठाकरे यांनी शिंत्रे यांची पक्षाच्या उपाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली.

यानंतर दोन दिवसांनी शिंत्रे यांनी पक्षाला रामराम ठोकून पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. त्यामुळे नाशिकमध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेतील गटबाजी पुन्हा ऐरणीवर आली आहे. २०१२ ते २०१७ या पाच वर्षाच्या काळात नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती. तर शहरातील चार पैकी तीन आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे होते. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षात गटबाजी झाल्याने त्याचा फटका बसला होता. मध्य नाशिक, पूर्व नाशिक व पश्चिम नाशिक या मनसेनेच्या आमदारांच्या जागी भाजपने कब्जा केला तर यानंतर २०१७ च्या महापालिका निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणात पिछेहाट होऊन फक्त पाच नगरसेवक २०१७ साली निवडून आले होते.

त्या पाच वर्षाच्या काळात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकचे विकासासाठी विशेष प्रयत्न केले होते. कोट्यवधी रुपयांची कामे देखील झाली. कुंभमेळा देखील यशस्वीरित्या झाला. तर शहरातील रिंग रोड तयार झाले. कामे करताना योग्य नियोजन झाल्यामुळे भ्रष्टाचाराचा देखील आरोप झाला नाही. असा दावा पक्षाचे वतीने करण्यात येत आहे, मात्र गटबाजीमुळे ही कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यात आम्ही कमी पडतो, असे काही नेत्यांनी सांगितले होते. आता पुन्हा पक्षातील काही नेत्यांमध्ये जमत नसल्याची चर्चा आहे. तर लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याच प्रमाणे मनपा निवडणूक देखील लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीत राज यांच्यासह अमित ठाकरे यांनी लक्ष देऊन पुन्हा संघटन बांधणी करण्याची गरज असल्याचे दिसत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या