ठाणे | Thane
राज्य सरकारने मुंबईत प्रवेश करताना लागणाऱ्या पाच टोलनाक्यांवर टोलमाफीची घोषणा केली आहे. यानंतर राज ठाकरे यांनी हे आपल्या मनसैनिकांच्या आंदोलनाच यश असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवरील केसेस मागे घेतल्या जाव्यात अशी मागणी केली आहे. टोलवसुली म्हणजे दरोडाच होता अशा शब्दांत त्यांनी टीकाही केली.
तो काय घरचा सत्यनारायण होता का?
या वेळी राज ठाकरे म्हणाले, “केसेस मागे घेतल्या पाहिजेत. तो काय आमच्या घरचा सत्यनारायण होता का? लोकंसाठी केलेली गोष्ट होती. आज सगळेजण खूश असतील. इतकी वर्ष आपल्यावर टोलधाड पडली होती. याला दरोडाच म्हणावे लागेल. किती पैसे आले, किती जमा झाले, कोणाकडे गेले कशाचा कोणाला पत्ता नव्हता. इतक्या वर्षांच्या आमच्या आंदोलनाला आलेले हे यश आहे. याबद्दल मी माझ्या मनसैनिकांचे अभिनंदन करतो. सगळे त्यांच्यामुळे शक्य झाले आहे’.
याआधीही राज ठाकरेंनी टोलमाफीवर भाष्य केले होते. “माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सातत्याने यासाठी प्रयत्न केले. काँग्रेसचे सरकार असल्यापासून ते लढा देत आहेत. आपली फसवणूक होत आहे हा मुद्दा आम्ही लोकांसमोर मांडला. आज हे पाचही प्रवेशद्वार बंद झाले आहेत. त्याबद्दल मी सरकारचंही अभिनंदन करेन. उशिरा का होईना पण त्यांना या गोष्टी समजल्या. फक्त काळजी एकाच गोष्टीची आहे की, निवडणुकीच्या तोंडावर टोलानाके बंद करायचे आणि नंतर सुरु करायचे असे होऊन चालणार नाही. तसे आम्ही होऊदेखील देणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी टोल बंद करायचे आणि निकाल लागल्यानंतर सुरु करायचे अशी फसवणूक करु नका. अशा अनेक गोष्टी आजपर्यंत घडल्या आहेत,” असे राज ठाकरे म्हणाले होते.
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका
माझे पोलिसांसोबत आता बोलणे झाले, बदलापूरसारखे तुम्ही हे प्रकरण अंगावर घेऊ नका. आरोपी कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे हे महत्त्वाचे नसून कधी कुठल्या पक्षाची ही भूमिका नसते. परंतु एखादी व्यक्ती त्याची विकृती पक्ष म्हणून पंखाखाली घालणार असू तर बघायलाच नको. तो कुठच्याही पक्षाचा असला तरी अशा कृत्यांना पाठीशी घालू नये. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्ट जामीन देते कसे, त्या पोरीचा पुन्हा जबाब द्या आणि तो जो कुणी असेल त्याला पुन्हा अटक करा असे पोलिसांना मी सांगितले आहे.
काय आहे प्रकरण?
ठाण्यातील भंडार आळीत एका ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिंदे सेनेचा उपविभागप्रमुख सचिन यादव याच्यावर कडक कारवाईसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह ठाणेकरांनी गुरुवारी मोर्चा काढला होता. हा मोर्चा ठाणे स्टेशन भंडार आळी ते मासुंदा तलावाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयापर्यंत काढण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध मंगळवारपर्यंत अतिरिक्त कलमे लावून कारवाई झाली नाहीतर प्रसंगी ठाणे बंदची हाक दिली जाईल असा इशारा मनसेने दिला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा