मुंबई | Mumbai
पुण्यातील सदाशीव पेठेत एका कॉलेज विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दर्शना पवार या तरुणीच्या हत्येने महाराष्ट्र हादरलेला असतानाच शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात तरुणीवर झालेल्या या हल्ल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील पाहायला मिळाले. विरोधीपक्षातील नेत्यांकडून पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट केलं आहे.
राज ठाकरे म्हणाले की, काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं. दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा, असंही राज ठाकरे म्हणाले.
आषाढी कार्तिकीच्या पूर्वसंध्येला ३२ गोवंश जनावरांना जीवदान
नेमकं काय घडलं?
पुण्यातील सदाशिव पेठेत पेरू गेट पोलीस चौकीच्या जवळच काल सकाळी एक तरुण आणि तरुणी गाडीवरून जात असताना आरोपीने ही गाडी अडवली. तसेच तरुणीच्या जवळ येऊन मला तुझ्याशी बोलायचे आहे. तू बोलत का नाहीस? असा सवाल त्याने केला. या तरुणीने आरोपीशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे या तरुणाचा राग अनावर झाला आणि त्याने बॅगेतून आणलेला कोयता बाहेर काढून थेट तरुणीवर उगारला. त्यामुळे ही तरुणी भयभीत झाली आणि जीव वाचवण्यासाठी ती सैरावैरा धावू लागली. या ठिकाणी असंख्य लोक होते. पण तिला वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. लेशपालने मात्र जीव धोक्यात घालून या तरुणीला वाचवले. आरोपीला गच्च पकडून त्याने बाजूलाच असलेल्या पेरू गेट पोलीस चौकीत गेला आणि आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दाखल झाला आहे. आता विश्राम बाग पोलिसांनी आरोपीचा ताबा घेतला असून त्याच्यावर गुन्हा दाकल केला आहे. आरोपीचे नाव शंतनु लक्ष्मण जाधव आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
आ. प्राजक्त तनपुरे यांच्याकडून तहसिल मधील अधिकार्यांची झाडाझडती